हत्तींना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून टीम दाखल

Edited by: लवू परब
Published on: March 30, 2026 20:27 PM
views 53  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हत्तींचा उपद्रव वाढत चालल्याने त्यांना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित १५ जणांची टीम दाखल झाली आहे. मात्र, यापूर्वीही अशाच एका टीमने हाकाऱ्यांना प्रशिक्षण देऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने शेतकरी कमालीचा चिंतेत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, केर आणि आसपासच्या गावांमध्ये सध्या हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसाढवळ्या रस्त्यालगत हत्तींचे कळप फिरताना दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कळपात लहान पिल्ले असल्यामुळे हत्तीण अधिक सतर्क व कधीही आक्रमक होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सहा हत्तींच्या कळपात विभागणी झाली आहे. ‘ओंकार’ हत्ती नेतर्डे परिसरात दिसत आहे. तर ‘बाहुबली’ टस्कर एका लहान मादीसह वेगळा फिरत आहे. याशिवाय एक मादी हत्ती आणि तिची दोन पिल्ले असा तिसरा गट तयार झाला आहे. हे कळप मोर्ले, केर, घोटगे आणि घोटगेवाडी भागात फिरत असून ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

रविवारी सायंकाळी घोटगेवाडी–मोर्ले–केर रस्त्यावर अचानक हत्ती आल्याने काही काळ वाहतूक थांबली. ग्रामस्थांनी खबरदारी घेत मार्ग काढला. त्या वेळी वनविभागाचे कर्मचारी आणि हाकारी पथक उपस्थित होते. दरम्यान, हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काजू बागांसह केळी व बांबू पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पिकांचे संरक्षण कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमधून आलेली टीम हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना जंगलाच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.