
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे "माय मराठी सेवा पुरस्कार" जाहीर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने २७ फेब्रुवारी "मराठी भाषा गौरव दिनाचे" औचित्य साधून माय मराठी सेवा पुरस्कार मराठी अध्यापकांना दिले जातात. यंदाचा जिल्हा पुरस्कार गोविंद सखाराम मोर्ये माऊली माध्यमिक विद्यालय , सोनुर्ली यांना जाहीर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आठ तालुक्यातील आठ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना माय मराठी सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यात सौ.संगीता संतोष रेडकर मळेवाड माध्यमिक विद्यालय मळेवाड, सौ .अनुजा अ .सावंत डिगस हायस्कूल डिगस ता .कुडाळ, दीपक बोडेकर उभादांडा हायस्कूल वेंगुर्ला, सौ .ज्योती तोरस्कर टोपीवाला हायस्कूल मालवण, सौ. नयना केसरकर एस .एम .हायस्कूल कणकवली, शंकर तुकाराम वाघमोडे माध्यमिक विद्यालय ,उंबर्डे, प्रेमनाथ पांडुरंग गवस बापूसाहेब देसाई विद्यालय, उसप, रामदास तुकाराम कोयंडे, मोड हायस्कूल यांना दिले जाणार आहेत. अध्यापक संघातर्फे गेले वीस वर्ष असे पुरस्कार देऊन मराठी अध्यापकान गौरविण्यात येते. श्री गोविंद मोर्ये यांनी वडिलांच्या प्रेरणेने सण १९९४-९५ मध्ये ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने स्वतःच्या घरात माऊली माध्यमिक विद्यालय सुरू केले. तीन वर्ष त्याच ठिकाणी शाळा सुरू होती. पहिली तीन वर्ष विनाअनुदान तत्त्वावर चालवण्यात आले.आता मात्र या शाळेला शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. स्वतःची अशी इमारत उभी करण्यात आलेली आहे. शाळेचा निकाल ही शंभर टक्के आहे. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. श्री मोर्ये सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून सावंतवाडी मुख्याध्यापक संघाचे गेली दहा वर्ष सचिव म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषेसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. या पुरस्कारांचे वितरण 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत .पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र, व ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम श्रीधर अपार्टमेंट बस स्थानका समोर सावंतवाडी येथे २७ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मराठी विषयातील तज्ञ श्रीकांत नाईक गडहिंग्लज, प्राध्यापक अरविंद देशपांडे कोल्हापूर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे यांनी दिली.