MUST READ | 'इथं' आहेत रंग बदलण्याचं सरड्याचंही 'रेकॉर्ड ब्रेक' करणारे राजकारणी !

आमचे सावंतवाडी करस्पॉडंट विनायक गावस यांचं रोखठोक विश्लेषण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2023 13:13 PM
views 448  views

सरडा हा तर सारखा सारखा रंग बदलतो ! हे तुम्ही खूपदा ऐकलं असेलच. सरडा हा प्राणी प्रसंगानुसार आपला रंग बदलतो. ज्या वास्तूच्या सानिध्यात असेल तसा तो रंग धारण करतो. पण, हे तो आपल्या बचावात्मक पद्धतीसाठी करतो. निसर्गानं दिलेल त्याला हे वरदान आहे. परंतु, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप या मित्रपक्षांची सद्यस्थितीची परिस्थिती पाहता सरड्याला सुद्धा लाज वाटत असेल. सरड्याला जमणार नाही एवढ्या जलद हे राजकीय नेतेमंडळी रंग बदलत आहेत. विरोधकांच काम देखील हे मित्रपक्षच करत आहेत. त्यामुळे यांच्यातील हा संघर्ष व दिखावू मैत्री पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील सरडा रंग बदलून जातोय. 


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर विरूद्ध भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यात स्पर्धा आहे. दोन टर्म सुरु असलेल्या या संघर्षात केसरकर बाजी मारत आहेत. परंतु, २०१९ ला राज्यात युती एकत्र लढत असताना भाजपचे राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गोव्यातील भाजपच मंत्रीमंडळ सावंतवाडीत तेलींच्या प्रचारासाठी आलं. पण, तेलींचा काहीशा मतांनी पराभव झाला. केसरकरांपेक्षा ९ टक्के मत तेलींना कमी पडली. यातच अडीच वर्ष 'मविआ' सरकार स्थापन झालं. राज्यमंत्री असणाऱ्या केसरकरांना ठाकरेंच्या मंत्रीमंडळात डावललं गेलं. स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध केसरकर हा संघर्ष आणखीन तीव्र होत गेला.


यातच  एकनाथ शिंदे यांचं बंड झाल अन्  राज्यात युतीच सरकार स्थापन झालं. दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. राणे विरूद्ध केसरकर हा टोकाचा वाद देखील शमला. परंतु, मतदारसंघातील भाजप विरुद्ध केसरकर हे राजकीय वैर काही संपता संपत नाही आहे. आगामी २०२४ हे त्यामागचं खरं कारण आहे. 


सत्तांतर झाल्यानंतर काहीकाळ स्थानिक पातळीवर भाजप व केसरकर यांच्यात सर्व काही आलबेल असल्याच पहायला मिळाल. खरेदी-विक्री संघात युती करत पहिला समेटही घडला. महाविकास आघाडीचा सुफडा साफ करत सेना-भाजप संघावर निवडून आले. पण, निवडून येताच काही महिन्यांत दोघांत फूट पडली. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शेवटपर्यंत युती नाही या भुमिकेत असणाऱ्या भाजपनं वरिष्ठांच्या आदेशानुसार शेवटच्या क्षणी नमतं घेत युती केली. मात्र, सेनेला भाजपनं आपली ताकद दाखवून दिली. ठाकरे गट देखील सेनेपेक्षा उजवा ठरला.


या नाट्यानंतर पुन्हा ही मंडळी एक झाली ती पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी. युतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी दीपक केसरकर व राजन तेली एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले. एकत्र प्रचार करत युतीचा उमेदवार निवडूनही आणला. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच भाजपच्या तेलींनी वेगळी भुमिका घेतली. एका समाजाच्या मेळाव्यात ''आपल्याला खोटं बोलता येत नाही'' असं म्हणत केसरकरांच्या कार्यपद्धतीवर तेलींनी जाहीर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर केसरकरांवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. मतदारसंघाचा विकास करायला केसरकर कसे कमी पडले ? हेच दाखवून देण्याच काम मित्रपक्ष भाजपचे राजन तेली करत आहेत. मंत्री केसरकर मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी असणाऱ्या संबंधांमुळे तेलींकडे जास्त लक्ष देत नसल्याच सांगत वेळ मारून नेत आहेत. विरोधकांच काम हे मित्रपक्षच करत असल्यानं ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आदी विरोधी पक्ष केवळ मजा घेतायत. 


आता एवढा संघर्ष झाल्यावर एकमेकांवर टोकाची टीका केल्यानंतर 'सावरकर गौरव यात्रेत' पुन्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि केसरकर समर्थक शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले. पत्रकार परिषदेत केसरकरांबद्दल बोलून दळवींना अडचणीत आणणारी वक्तव्य करणार नाही असं तेली म्हणाले. यातच काल पुन्हा केसरकरांवर टीका करण तेलींनी थांबवाव अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करू, असा इशारा देताना केसरकर समर्थक शिवसैनिक दिसले.


राजकीय स्वार्थापोटी काहीक्षण एकत्र येऊन स्थानिक भाजप व शिवसेना नेते केवळ जनतेची दिशाभूल करण्याच काम करत आहे. आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत क्षणांत एक होऊन क्षणार्धात एकमेकांच्या झिंज्या उपटत आहे. एकंदरीतच, एका रात्रीत भुमिका आणि विचार बदलणारे हे राजकीय नेतेमंडळी सरड्यालाही लाज वाटावी, असे रंग बदलत आहेत.