
दोडामार्ग : 18 मे 2022. वेळ सायंकाळी 6. 30 ची. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी धनगरवाडीतील उमेश बाळू फाले पत्नीला दुध आणायला जातो म्हणून सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी आलाच नाही. 5 दिवसांनी म्हणजेच 23 मे 2022 ला उमेश फालेचे काका संतोष फाले यांनी दोडामार्ग पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. हा घटनाक्रम इथेच संपला. मात्र, त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी 22 ओगस्ट 2024 ला पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. उमेश फाले बेपत्ता नसून त्याचा खून झाल्याच समोर आलं. उमेशकडून पत्नीशी अनैतिक संबंधाचे होणारे आरोप आणि शिवीगाळ याचमुळे रागाने पिसाळलेल्या उमेशचा संशयित आणि त्याच्या साथीदारांकडून निर्दयीपणे काटा काढण्यात आला. डोक्यातच दगड घालून उमेशला कायमच संपवण्यात आलं. नेमका हा खून कसा केला ? 2 वर्षांनंतर पोलिसांनी या घटनेचा छडा कसा लावला.
बेपत्ता झालेल्या उमेश फालेचा खून झाला असेल अशी कल्पनाही कोणाच्या डोक्यात आली नाही. घरच्यांनीही कुठला आक्षेप नोंदवला नाही. मात्र पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि खून करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्यात. दरम्यान पोलिस तपासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्यात. उसप इथं राहणारा मुख्य आरोपी राजाराम गवस आणि उमेश फाले यांची पत्नी यांचं अफेअर असल्याचा संशय उमेशला होता. एक दोनदा घरातही या दोघांना उमेशने एकत्र पाहिलं होत. उमेशला याचा संताप होता . हाच राग डोक्यात ठेवून उमेशने राजारामला शिवीगाळ करायचा. उमेशची शिवीगाळ आणि सतवणूक याच भूत राजारामच्या डोक्यात गेल्याने अखेर उमेशला कायमचा बंदोबस्त करायचा अघोरी निर्णय राजारामने घेतला . राजारामने आपल्या सोबतींच्या मदतीने हा प्लॅन केला. अनिकेत नाईक आणि सचिन बांदेकर हे राजारामचे साथीदार. या दोघांनी उमेशला दारू प्यायला बोलावलं. उमेशला घेऊन ते घाटवाडी, वडेश्वर मंदिर, तिलारी ते बिचोली कॅनल जवळ घेऊन आले. इथेच उमेशचा घात झाला. अनिकेत नाईकने त्याचे हात धरले तर सचिन बांदेकरने पाय धरले. राजारामने उमेशच्या गुप्तांगावर लाथा मारत डोकं दगडाने ठेचत अमानुषपणे खून केला. राजमाराने त्याच्या वाटेतील अडथळा कायमचा बाजूला केला. इतकंच नव्हे तर नंतर उमेशची बॉडी सुमारे दीडशे मीटर फरपटत नेऊन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या तिलारी ते बिचोलीम कॅनॉलमध्ये टाकून दिली. ही घटना घडून दोन वर्षे झाल्यानंतर खबऱ्याच्या मदतीने पोलिसांना याचा सुगावा लागला. खून करून हे तिन्ही आरोपी आपल्याच गावात मोकाट फिरत होते. कसून चौकशी केल्यावर या तिघांनी गुन्हा कबूल केलाय. पोलिसांनी या तिघांना अटक केली. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व त्यांच्या टीमने स्थानिक गुन्हा अन्व्हेशन शखेच्या मदतीने ही मोहीम यशस्वी पार पाडली. या आरोपीना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 28 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतः अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले दोडामार्ग मध्ये दाखल झालेत. त्यामुळे बेपत्ता असलेल्या उमेशचा खून झाल्याचं उघड झालं असल तरी आता मृतदेहाचे अवशेष शोधण्याच आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र आता हे खून प्रकरण ऐकून सिंधुदुर्ग जिल्हा सुन्न झालाय.