मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचे‌ खा. नारायण राणेंना आश्वासन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 11, 2025 17:39 PM
views 267  views

कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि सिंधुदुर्गवासीयांना विमानाने मुंबईतून जिल्ह्यात येता येणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ही सेवा तात्काळ पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.  खासदार नारायण राणे यांनी या सेवेच्या पुनरुज्जीवनाची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचे भेट घेऊन केली, त्यावेळी  मंत्री नायडू यांनी हे आश्वासन दिले

राणे यांनी नायडू यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.‌ कोकणातील जनतेला होणारा त्रास आणि गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन, ही सेवा लवकरात लवकर सुरू होणे कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी मंत्र्यांना पटवून दिले. राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नायडू यांनी ही सेवा तत्काळ पूर्ववत करू, असे आश्वासन दिले आहे.

या निर्णयामुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगाने पूर्ण करता येईल, ज्यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.  विमानसेवेमुळे व्यापारी आणि उद्योजकांना जलद कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल. निसर्गरम्य कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला नवी उंची मिळेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.