मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर समाजकार्य विभाग ग्रामीण अभ्यास शिबीर निरवडे गावात संपन्न !

विविध तज्ञांचं मार्गदर्शन
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 20, 2023 17:25 PM
views 260  views

सावंतवाडी : समाजकार्य विषयाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्यासाठी ग्रामीण अभ्यास शिबिराचे ग्रामपंचायत निरवडे येथे करण्यात आले होते. वर्गामध्ये शिकवण्यात येणारे थेअरी ज्ञान प्रत्यक्ष कसे वापरायचे याचे प्रात्याक्षिक या अभ्यासातून विद्यार्थ्यांना समजले. या शिबिरात विविध उपक्रम राबवण्यात आले.


यामध्ये प्रथम मशालफेरी काढण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक शाळा यांना भेटी देऊन त्यांचे ग्रामीण भागातील कार्य विद्यार्थ्यांनी समजावून घेतले. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. गावातील ग्रामस्थांसोबत ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले. त्याचबरोबर किशोरवयीन मुली व त्यांच्या माता यांच्यासाठी किशोरवयातील बदल या विषयावर डॉ. रिया सणस याचे व्याख्यान आयोजित केले होते.


आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रथमेश सावंत याचे मार्गदर्शन लाभले तर स्वयंरोजगार व संधी या विषयासाठी यशवंत पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर निरवडे गावातील सर्व शाळेतील मुलांसाठी बाल मेळावा तर महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. यामध्ये पाककला स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थी व महिलांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग दर्शविला. समाजकार्य विद्यार्थ्यांसाठी समाज कार्यकर्त्याच्या भूमिका यावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये शशांक मराठे यांनी कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकाची भूमिका यावर मार्गदर्शन केले तर मानसिक आरोग्य व संधी यावर प्रवीण चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.


आरोग्य क्षेत्रातील व बाल संरक्षण कक्ष यामध्ये समुपदेशकाची भूमिका यावर रोहन शारबिंद्रे, नंदकिशोर फोंडकर यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत निरवडे यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्व विद्यार्थ्यांना व विभागाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निरवडे ग्रामपंचायत मधील सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामसेविका कदम तसेच ग्रामपंचायत सदस्य आदेश जाधव व इतर सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. याचबरोबर सिंधुदुर्ग उपपरिसर संचालक श्रीपाद वेलींग यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. प्रा अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे आणि प्रा पूनम गायकवाड यांनी ग्रामीण अभ्यास शिबीर  यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.