मुंबई - गोवा हायवेच्या दुरवस्थेला जबाबदार कोण ?

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा सवाल
Edited by: दिपेश परब
Published on: July 09, 2024 12:46 PM
views 147  views

वेंगुर्ला : मुंबई-गोवा महामार्गाचे गेली तेरा वर्षे काम सुरू आहे. बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हजारो कोटी रूपायांचा खर्च या महामार्गावर करण्यात आला. दरवर्षीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होत असते. त्यामुळे यावर्षीच जास्त पाऊस पडला असे म्हणता येणार नाही. जर दरवर्षीच अशा प्रकारचा पाऊस जिल्ह्यात होत असेल तर महामार्गावर पाणी येणार नाही अशा पद्धतीने महामार्गाचा आराखडा बनवून त्या पद्धतीने महामार्गाचे बांधकाम का करण्यात आले नाही? महामार्गाच्या बांधकामामुळे महामार्गच्या लगत पूरसदृश्य परिस्थीती निर्माण होऊन स्थानिकांना त्याचा त्रास होत असेल तर त्याला जबाबदार कोण? महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना यशाचे श्रेय घेणारे आता याचे पण श्रेय घेणार आहेत का असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नाही. अनेक ठिकाणी सर्विस रोड योग्य पद्धतीने केलेले नाहीत. या निकृष्ट कामाची चौकशी होऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला आहे.