
मुंबई : विलेपार्ले येथील आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपी प्रकाश दयाशंकर व्यास यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 18 एप्रिल 2026 रोजी फेटाळला आहे. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी दिलेल्या आदेशात प्रकरणातील उपलब्ध पुरावे आणि आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन जामीन नाकारण्यात आला .
सदर प्रकरण विलेपार्ले पोलीस ठाण्यात गु. र. क्र. 142/2025 अन्वये नोंद असून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) व 61(1) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादी, ‘गीता रेस्टॉरंट’चे मालक शेट्टी वय 77, यांना बीएमसीशी संबंधित अडचणी सोडवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी संगनमताने सुमारे 82 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात काही रक्कम बँक व्यवहारातून तर काही रोख स्वरूपात घेण्यात आल्याचे नमूद आहे .
याच गुन्ह्यातील सहआरोपी पवन मुतरेजा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी उच्च न्यायालयाने 16 मे 2025 रोजी फेटाळला होता. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपींकडून रक्कम परत करण्याची तयारी दर्शवण्यात आली असून, आतापर्यंत आरोपी मुतरेजा याने प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रक्कम परत केली आहे. सद्यस्थितीत प्रकाश व्यास यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आल्यामुळे, त्याच्याकडूनही रक्कम परत करण्याची तयारी दर्शवण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मधील निवृत्त अधिकारी दिवाकर अनंत सावंत यांचे चिरंजीव व कै. अ. ला. सावंत कै. कविवर्य वसंत यांचे नातू अॅड. चिराग सावंत यांनी प्रभावीपणे मांडणी करत प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयासमोर अधोरेखित केले असून, त्यांच्या प्रभावी पाठपुराव्याला या घडामोडींमध्ये महत्त्वाचे स्थान असल्याचे मानले जात आहे.










