कार्यकारी सहाय्यक पदभरतीत विलंब

निवड झालेल्या उमेदवारांची नाराजी
Edited by:
Published on: September 28, 2025 15:10 PM
views 155  views

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदभरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आपल्या हक्काच्या नियुक्तीसाठी थांबावे लागत असल्याने उमेदवारांनी आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याची मागणी केली आहे.

महापालिकेने ९ एप्रिल २०२५ रोजी कार्यकारी सहाय्यक पदासाठी निवड यादी जाहीर केली होती. त्यानंतर ५ मे ते ९ मे २०२५ दरम्यान कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली. तसेच कागदपत्रांबरोबर घेतलेली नॉन क्रिमिलेयर, EWS, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन प्रमाणपत्रे भरती विभागाकडून अडीच महिन्या नंतर पडताळणी साठी पाठविण्यात आली. ओपन, SC, ST प्रवर्गातील ६६२ उमेदवारांची नियुक्ती १ सप्टेंबरपासून सुरू होऊन १७ सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाली असली तरी नॉन क्रिमिलेयर, EWS, माजी सैनिक,  प्रकल्पग्रस्त, अंशकालीन आणि खेळाडू या प्रवर्गातील उमेदवारांची प्रमाणपत्रे विभागीय स्तरावर प्रलंबित असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणी प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. या प्रक्रियेमध्ये जवळ एक महिना कालावधी लागेल. त्यानंतर नियुक्ती साठी पण भरपूर कालावधी लागणार आहे.

१५ जुलै २०२५ रोजी NCL पडताळणीसंबंधी अहवाल आयुक्तांकडे पोहोचूनही जवळपास ७० ते ८० टक्के उमेदवारांची प्रक्रिया अडथळ्यात आहे. उमेदवारांचे म्हणणे आहे की, “आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केली असूनदेखील विभागीय ढिलाईमुळे आमचे भविष्य धोक्यात आले आहे.” भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम, आर्थिक ताण आणि असुरक्षितता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून उर्वरित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व रुजू प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर १० जणांचे प्रतिनिधी मंडळ आयुक्तांना भेटून प्रत्यक्ष समस्यांवर चर्चा करणार असून या भेटीला परवानगी देण्याची मागणी अधिकृतरित्या सादर करण्यात आली आहे.