
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीच्या ठिकाणीच तीन मजली इमारत उभारून मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी पाठवला आहे असे लेखी आश्वासन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिल आहे. त्यामुळे अण्णा केसरकर यांनी हे उपोषण स्थगित केले आहे.
ते म्हणाले, सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे जागेच्या वादामुळे ५ वर्ष रखडले होते. अलीकडेच आपण या विषयावरून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर तसेच शहरातील अन्य दोन राखीव जागेवर हॉस्पिटल उभारण्याची मागणी केल्यानंतर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी या संदर्भात बैठक बोलावली. त्याला माझ्यासह जिल्हा शल्यचिकत्सक डाॅ. बी. एस नागरगोजे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण तसेच अन्य आरोग्य अधिकारी व महसुल अधिकरी उपस्थितीत होते. याठिकाणी जागेच्या वादात अडकून पडण्यापेक्षा शहरातील बाहेरचवाडा व भटवाडी व पोलिस ग्राऊंड या जागेचा विचार करावा अशी मागणी केली. मात्र या जागेच्या भुसंपादनाला वेळ लागणार असल्याने या दोन्ही जागा वगळून आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी नव्या इमारतीवर अजून तीन मजले वाढवून तेथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीची मागणी केसरकर यांनी केली. या इमारतीवर तीन मजले बांधकाम होऊ शकते का तशा प्रकारे इमारतीचे पहिलीचे बांधकाम आहे का याबाबत इंजिनीयर कडून माहिती घेण्यात आली. त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधताना सहा मजल्याचा प्लॅन करूनच ह्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते हे निश्चित झाले. त्यानंतर या ठिकाणीच मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचे निश्चित करण्यात आले. तसा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांनी तयार केला आहे. हा प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे.
मल्टीस्पेशालिटी उभारणी बाबत आता शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. शिवाय याला कोणीतरी खो घातल्यास हे काम पुन्हा रखडू शकते. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा विचार करता त्याला कोणी खो घालू नये ही आपली मागणी आहे. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी जागा संपादित करून त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, निधी लक्षात घेता आहे त्या ठिकाणी मटीस्पेशालिटी उभारल्यास जलदगतीनं जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.