
सावंतवाडी : प्रशासकीय राजवट असणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेनं घरपट्टी व पाणीपट्टीत कुणालाही विचारात न घेता मोठी वाढ केल्यान धक्का बसला आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. २५ रूपयांपासून ३९९ रूपये घरपट्टी असणाऱ्यांना सरसकट ४०० रूपये आकारणी करण्यात येणार आहे. सर्वसामान्य गोरगरीबांना यांची झळ बसणार आहे. २५ रूपये असणाऱ्या ३७५ रूपयांचा भुर्दंड बसणार आहे. पाणीपट्टीतही ३ रूपये वाढ केली जाणार आहे. याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच लक्ष वेधणार असल्याचं जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याच्या न.प.च्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच लक्ष वेधत याबाबतच निवेदन दिले आहे. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी आदि उपस्थित होते.