
सावंतवाडी : सांगली येथील केपीज बुद्धिबळ ॲकॅडमीने आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकॅडमीने चमकदार कामगिरी करत 'बेस्ट ॲकॅडमी' हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, मुक्ताई ॲकॅडमीने हा पुरस्कार चार वेळा जिंकणारी जिल्ह्यातील एकमेव ॲकॅडमी ठरण्याचा मान मिळवला आहे.
जागतिक बुद्धिबळ संघटना फिडेच्या १११ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवर्य कुमार पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत देशभरातील सहा राज्यांतून आणि पाच देशांमधून तब्बल ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नऊ, तेरा वर्षांखालील आणि खुल्या गटात ही स्पर्धा खेळवण्यात आली.
मुक्ताई ॲकॅडमीच्या आठ ते चौदा वयोगटातील अकरा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आठ फेऱ्यांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. १३ वर्षांखालील गटात विराज दळवी आणि चिदानंद रेडकर यांनी प्रत्येकी सहा फेऱ्या जिंकून अनुक्रमे १८वा आणि २०वा क्रमांक पटकावला. अथर्व वेंगुर्लेकर याने पाच विजय मिळवून एक फेरी बरोबरीत सोडवली, तर लिएंडर पिंटो आणि हर्ष राऊळ यांनीही प्रत्येकी पाच विजयांची नोंद केली. खुल्या गटात पार्थ गावकरने चार विजय मिळवून १५ वर्षांखालील गटात आठवा क्रमांक पटवला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
मुक्ताई ॲकॅडमीचे आठ वर्षीय खेळाडू स्वराज सावंत, प्रज्वल नार्वेकर, दक्ष वालावलकर यांनी मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळताना प्रत्येकी चार विजयांसह लक्षवेधी कामगिरी केली. साक्षी रामदुरकरनेही तीन विजय मिळवले. या यशाबद्दल मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आणि ॲकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक. उत्कर्ष लोमटे यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.