
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सतत सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे आक्रमक झालेल्या ग्रहाकांनी आज महावितरणला धडक दिली. वीज ग्राहक संघटनेच्यावतीने उप अभियंता शैलेश राक्षे यांना जाब विचारला गेला. यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावातील प्रतिनीधी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करून वीज खंडीत होऊ नये याची दक्षता घ्या, अशी मागणी उपस्थितांनी केली. यावेळी आठ दिवसांच्या आत आवश्यक गोष्टींच अंदाजपत्रक तयार करून त्रृटी दूर करण्याची ग्वाही श्री. राक्षेंनी वीज ग्राहकांना दिली.
सावंतवाडी शहरासह तालुक्यातील माजगाव, मळगाव, तळवडे, माडखोल, निगुडे आदी गावांतील प्रतिनिधींनी वीज ग्राहक संघटनेसह महावितरणचे उप अभियंता श्री. राक्षे यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले. सतत विद्युत पुरवठा खंडित होऊन उपकरण बिघडत असून याला जबाबदार कोण ? असा सवाल केला. तसेच वयोवृद्ध, आजारी व्यक्ती घरात असताना सतत विद्युत पुरवठा खंडित होऊन हानी झाल्यास महावितरण जबाबदारी घेणार का ? दिवसातून सहा-सहा वेळा लाईट का जाते ? याच कारण काय असा सवाल करत उपस्थितांनी प्रश्नांचा भडीमार केला. ग्रामीण भागातील समस्यांबाबतही यावेळी महावितरणचे उप अभियंता शैलेश राक्षे, शहर अभियंता वीणा मठकर यांना जाब विचारला.
दरम्यान, उप अभियंता श्री राक्षे म्हणाले, ट्रिपींगमुळे प्रवाह खंडीत होत होता. त्यात सुधारणा करण्यात येत आहे. तसेच आवश्यक गोष्टींच अंदाजपत्रक तयार करून आठ दिवसांत दुरावस्था दुर करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी, ही डागडुजी यापूर्वी होण आवश्यक होतं. याला विलंब झाल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या समस्यांसंदर्भात आमदारांनी महावितरणची बैठक लावतो असं आश्वासन दिले होते. मात्र, ही बैठक झाली की नाही ? याची कल्पना नसल्याचे संघटनेचे प्रतिनिधी म्हणाले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे याप्रश्नी लक्ष वेधणार असल्याचे वीज ग्राहक संघटनेने सांगितले. यावेळी वीज ग्राहक संघटने जिल्हाध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, अँड संजू शिरोडकर, बाळासाहेब बोर्डेकर, आबा कोटकर, गुरूदास गवंडे, महेश खानोलकर, तुकाराम म्हापसेकर, नारायण जाधव, एस. एन. तेली, समिर शिंदे, संतोष तावडे आदींसह वीज ग्राहक उपस्थित होते.