
सावंतवाडी : बळी घेतल्यावरच जाग येणार का ? असा प्रश्न सावंतवाडीकर जनतेला पडला आहे. याच कारण ठरलं आहे ते म्हणजे महावितरण अन् नगरपरिषद प्रशासनाची टोलवाटोलवी. तसेच तालुक्यातील समस्यांकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फिरवलेली पाठ. यामुळेच हा असा उद्विग्न सवाल अधिकारी, प्रशासनाला सामान्यांना विचारावा लागत आहे.
सावंतवाडी शहरात अनेक ठिकाणी ११ केव्ही विद्युत भारीत लाईनवरुन झाडांच्या फांद्या गेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी त्या हटवण क्रमप्राप्त होते. मात्र, गेल्या चार वर्षांत त्याकडे कानाडोळा केला गेला आहे. यामुळे आज या फांद्यानी महावितरणच्या नाकी दम आणला आहे. शहरात मुख्य बाजारपेठत ही परिस्थिती आहे. शालेय मुल, महिला, वयोवृद्धांसह मोठ्या संख्येने नागरिक येथून ये-जा करतात. त्यात शाळा, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल जवळ असल्यानं रहदारीचा हा रस्ता आहे. याच ठिकाणी ११ केव्ही विद्युत भारीत लाईनवरुन भली मोठी फांदी गेली असून ट्रीपींग देखील होत आहे. मागच्या चार वर्षांत दखल न घेतल्याऩ ही अवस्था आहे. दस्तुरखुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनीही यात लक्ष घातलं होतं. महावितरण कार्यकारी अभियंतांना सुचना दिल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ पहाणी केली अन् परिस्थिती तशीच राहीली. यात २ जिल्हाधिकारी मात्र जिल्ह्यात येऊन बदली होऊन गेले.
झाडांच्या फांद्या कुणी हटवायच्या यावरून महावितरण आणि नगरपरिषद यांच्यात ढकलाढकली सुरू आहे. वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता म्हणतात आपण नगरपरिषदेला सांगितले आहे. तर नगरपरिषद म्हणतं ही झाडं- फांद्या जागा अथवा झाड मालकांनी तोडावी अन्यथा होणाऱ्या जीवीत वा वित्त हानीस संबंधित जबाबदार राहतील. अधिकारी, प्रशासन यांच्या या जबाबदारी झिडकारण्याच्या भानगडीत समस्या मात्र अधिक वाढत चालली आहे. त्यामुळेच बळी गेला की प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल केला जात आहे. आजवर ओटवणे येथली दहावीतील विद्यार्थी, बांदा येथील महिला, शहरातील पाळंदे कुरीअरचे मालक अन् पोलवर चिटकून गतप्राण होणारे अनेक वीज वितरणाचे कंत्राटी कर्मचारी. मुक्या प्राण्यांची यात गीनतीच नाही. हे सगळं बघता अजून किती बळी प्रशासनाला हवे आहेत ? हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातीलही परिस्थिती वेगळी नाही. तेथील वीज खांब, ट्रान्सफॉर्मर व इतर उपकरणांची परिस्थिती भयंकर आहे. आंबोली सारख्या पर्यटनस्थळी भर बाजारात असणार भिषण वास्तव समोर आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी तिथे साधे डोळे उघडून पाहायला तयार नाहीत. रहदारीच्या ठिकाणी विद्युत खांब पूर्णतः गंजला असून धोका निर्माण झाला आहे लाखो पर्यटक देश विदेशातून इथे येतात. शंभर वेळा सडलेला खांब बदलण्यासाठी विनंत्या केल्या. परंतु, कोणीही याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही. हा सडलेला लाईटचा खांब भर वस्तीमध्ये आहे. आंबोलीच्या वादळ वारा पावसामुळे कधीही कोसळू शकतो. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. लाईटचे खांब बदलण्यासाठी सुद्धा आम्ही उपोषण करायची का ? असा सवाल संतप्त आंबोली ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे महावितरणसह जबाबदार इतर प्रशासनाला जाग नेमकी कधी येणार ? की अशीच मृतांची आकडेवारी अन् शासनाचे ५ लाख भरपाई देण्यात धन्यता मानणार असा संतप्त सवाल सामान्यांतून विचारला जात आहे.