
देवगड : तालुक्यातील बागवाडी उत्कर्ष मंडळ, मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळता निमित्त झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली. बागवाडी उत्कर्ष मंडळ, मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळतानिमित्त खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन श्री देव मांडकरी देवालय, बागवाडी रंगमंचावर १४ मार्चला करण्यात आले होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहा जाधव (इन्सुली), तृतीय इशा गोडकर (शिरोडा) यांनी मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे रु. ८०००/ रु., ५०००/ रु., ३०००/ रु. व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्तेजनार्थमध्ये सात बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये चतुर्थ भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), पाचवा सायली राऊळ (पिंगुळी, कुडाळ), सहावा शंकर गवस (दोडामार्ग), सातवा कीर्ती तारी (मिठमुंबरी, बागवाडी), आठवा पूर्वा मेस्त्री (कणकवली), नववा समर्थ गवंडी (रेडी), दहावा तन्मय आईर (पिंगुळी, कुडाळ) यांनी मिळविला.या सर्वांना प्रत्येकी रु एक हजाराचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत एकूण २७ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण संजय पांचाळ व श्वेता मिठबावकर यांनी केले. स्पर्धेचे
निवेदन संजय धुरी यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष उमेश तारी, सचिव प्रमोद आडकर, खजिनदार लिलाधर तारी, उपाध्यक्ष नारायण तारी, सहसचिव विजय नेसवणकर, सहखजिनदार आप्पा नेसवणकर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व मुंबईवासीय चाकरमानी आदी उपस्थित होते.
खास शिमग्याच्या लळतानिमित्त संपूर्ण रात्र विविध कार्यक्रमांनी जागविण्यात आली. यांमध्ये नृत्यस्पर्धेसह गायन झाले. अनिल सादये, विघ्नेश सादये, राकेश मिठबावकर यांनी विविध गीते सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. किशोर सादये यांनी सोंग साकारत कार्यक्रमात रंगत आणली. नारद गिरीश तारी यांनी नाट्यगीते सादर केली. त्यांना संगीतसाथ हार्मोनियम सुरेश सादये, तबला विघ्नेश सादये यांनी दिली.