द ग्रेट मराठा पुरस्कार खासदार नारायण राणे यांना प्रदान

Edited by: मकरंद पटवर्धन
Published on: January 18, 2025 19:45 PM
views 296  views

रत्नागिरी : अखिल मराठा फेडरेशनतर्फे अखिल मराठा महासंमेलनात आज माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांना फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांच्या हस्ते द ग्रेट मराठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि छत्रपतींची प्रतिमा व दोन तलवारी असणारी काचेची फ्रेम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

द ग्रेट मराठा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात येणार होता, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नवनियुक्त आमदारांचाही सन्मान होणार होता. परंतु तेही येऊ शकले नाहीत. खासदार व छत्रपतींचे वंशज छत्रपती शाहू महाराज प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नसले तरी त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवला.

कार्यक्रमात माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आमदार बाळ माने, माजी जि. प. अध्यक्ष उदय बने, माजी अध्यक्ष रोहन बने, सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, माजी जि. प. सभापती राजेंद्र महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघ, अ. म. फेडरेशन व मराठा बिझनेसमन फोरमचे संस्थापक (कै.) शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आला. तसेच मराठा नेते (कै.) केशवराव भोसले यांच्या कुटुंबियांनाही गौरवण्यात आले. आर्किटेक्ट संतोष तावडे यांना सन्मानित केले. तसेच प्रताप सावंतदेसाई, दीपक साळवी व सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार केला.

महासंमेलनाच्या निमित्ताने रत्ननगरी सजली. कार्यक्रमस्थळी स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर, सर्वत्र भगवे ध्वज, तुतारी वादन, सर्वांच्या डोक्यावर फेटे आणि पारंपरिक वेशभूषेत देशातील अखिल मराठा फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते पाहायला मिळाले. निमित्त होते तिसऱ्या अखिल मराठा महासंमेलनाचे. रत्नागिरीतील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळाने या सहआयोजकत्व स्वीकारले व या संमेलनाचे सुरेख नियोजन केले.

संमेलनात रविवारी होणारे कार्यक्रम

रविवारी सकाळी १० वाजता आजची जिजाऊ (कर्तबगार मराठी महिला आणि त्यांच्या पुढील आव्हाने) यावर चर्चासत्र होईल. यात अस्मिता मोरे-भोसले, कविता पाटील, डॉ. ज्योती शिंदे, राधिका बराले, डॉ. स्वराली शिंदे अशा नामवंत महिला सहभागी होतील. दुपारी १२ वाजता अभियान उद्योजकतेचे यात प्रथितयश व्यक्तीमत्व उमेश भुजबळराव, उज्वल साठे, प्रफुल्ल तावरे, केतन गावंड, राजेंद्र घाग, सुरेश कदम सहभागी होतील. महिला उद्योगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता सांगता समारंभाचे अध्यक्षस्थान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, सरखेल आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव उपस्थित राहणार आहेत.