शिक्षक भारतीचे जिल्हा परिषदे समोर धरणे !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 09, 2024 12:42 PM
views 122  views

सिंधुदुर्गनगरी  : जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांतील शिक्षकांचे समायोजन करावे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करावे, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबवून बदली धारक शिक्षकांना सर्व रिक्त जागा खुल्या करण्यात याव्यात यासह विविध २३ मागण्यासाठी शिक्षक  भारती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्यातच मुख्यत्वे आंतरजिल्हा बदली जिल्हा अंतर्गत बदली रिक्त जागा भरणे या सहविविध सध्या गाजत आहेत.  यासाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग ते जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद समोर दुपारच्या सत्रात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोषाध्यक्ष रवींद्र देसाई यांच्यासह महेश नाईक, आशा गुणीजन, वैशाली गरकळ, दिनकर शिरवळकर, विश्वनाथ चव्हाण ,रामचंद्र डोईफोडे, रामचंद्र सातोसे, प्रशांत निंबाळकर, संजय घाडी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. यासाठी शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.  

या आहेत प्रमुख मागण्या..!

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करा.जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबवून बदली झालेल्या शिक्षकांना सर्व रिक्त जागा दाखविण्यात यावेत. शून्य शिक्षकी शाळांचे समायोजन करावे. समांतर आरक्षणातील समुपदेशन झालेल्या शिक्षकांना तातडीने नियुक्ती द्यावी.पवित्र प्रणालीने भरती करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे.  नवीन शिक्षकांना शालार्थ ओळखपत्र तातडीने मिळावे. विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांचे प्रमोशन करावे. २००५ पूर्वीच्या शिक्षक सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रभारी केंद्रप्रमुखांची नेमणुका कराव्यात. प्रलंबित गणित विषय शिक्षकांना तात्काळ नियुक्ती द्यावी यासह विविध २३ मागण्या या निवेदनातून करण्यात आले आहेत.