
सावंतवाडी : पावसाळ्यास सुरुवात होताच शहरात डासांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या नगरपरिषदेचा कारभार प्रशासक हाकत असल्यानं लोकांची गाऱ्हाणी ऐकायला व पूर्ण करायला त्यांचे प्रतिनीधी सभागृहात नाहीत. 'हॅप्पी नाईट' शिवाय सुखाची झोप घेण मुश्किल झाले आहे. त्यामुळे डासांच्या या डोकेदुखीपासून सावंतवाडीकरांची मुक्तता करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला केव्हा जाग येणार ? असा सवाल सावंतवाडीचे नागरिक विचारत आहेत.
खुले गटार व दुर्गंधीमुळे शहरात डासांच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल आहे. यामुळे डासांपासून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रात्री 'हॅप्पी नाईट' अगरबत्ती, मॉरटीन कॉईल लावल्याशिवाय सुखाची झोप शहरवासीयांना लागत नाही आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून डासमुक्त मोहीम राबवत फवारणी करणे आवश्यक आहे. पावसात डासांची पैदास होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. परंतु, प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हक्काचे प्रतिनिधी नगरपरिषद सभागृहात नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांना वाली उरले नाही आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून कारभार हाकणारे प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत सावंतवाडीकरांची डोकेदुखी ठरणारी डासांची समस्या कायमची दूर करात या मच्छरमारीतून मुक्तता करावी अशी मागणी होत आहे.