
कुडाळ : सिंधुदुर्गचा राजा गणपती येथे २९ ऑगस्ट २०२५ रोजी 'श्री गणेशा आरोग्याचा' या नावाने एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सिंधुदुर्ग चा राजा प्रतिष्ठान व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित या शिबिरात एकूण ११६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी आनंद शिरवलकर, विनायक राणे, आबा धडाम, अभिजीत गावडे , विलास कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात विविध प्रकारच्या आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये ४१ पुरुष, ५० महिला, ८ बालक आणि १७ बालकांचा समावेश होता. शिबिरात तपासणी झालेल्या एकूण ११६ रुग्णांपैकी ५० रुग्णांवर औषधोपचार करण्यात आला. याव्यतिरिक्त, १ शस्त्रक्रिया रुग्ण, २३ स्त्रीरोग रुग्ण, ८ श्वसनविकार रुग्ण, २ बालरोग रुग्ण आणि ९ अस्थिरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच, ११ रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या आणि ३ रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार ९ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
या शिबिराला अनंत डवंगे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, बालरोग तज्ञ डॉ. सुशांत कुलकर्णी, शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. मोनालिसा वज्रतकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. सौरभ पाटील आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियांका कासार-पाटील यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. या आरोग्य शिबिरामुळे कुडाळ तालुक्यातील अनेक नागरिकांना त्यांच्या गावाजवळच आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला.










