नैतिकता हा बौद्ध समाजाचा सिद्धांत

एस. एस. वानखडे यांचे प्रतिपादन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 11, 2025 20:56 PM
views 113  views

कणकवली : नैतिकता हा बौद्ध समाजाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी आत्मसात केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेतृत्व विकसित करण्यासाठी ज्ञानी व प्रज्ञावान बनले पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेचे काम करताना संकटे आणि आव्हानेही येणार आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नेहमीच सज्ज राहिले पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून संघटनेचे जाळे मजबूत करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अ‍ॅड. डॉ. एस. एस. वानखडे यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे येथील नगरवाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन अ‍ॅड. वानखडे व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अ‍ॅड. वानखडे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा प्रा. सुषमा हरकुळकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, संरक्षण उपाध्यक्ष दिलीप तरंदळेकर, मुंबई शाखेचे अध्यक्ष श्रीकांत कदम, माजी संघटक विजय जाधव, महिला सचिव अपूर्वा पवार, केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर, सचिव विलास वळंजू, अजय कदम, जनीकुमार कांबळे, विश्वनाथ कदम, पं. ध. माणगावकर, माजी महिला अध्यक्षा सुनीता कांबळे, श्रद्धा कदम, दीपक कांबळे, गुणाजी जाधव, महेंद्र कदम, अभियंता अनिल जाधव, आर. डी. कदम, तालुकाध्यक्ष भाई जाधव, रविकांत कदम, सुभाष जाधव, विजय नेमळेकर, निलेश वर्देकर, चंद्रकांत म्हापणकर, दि बुद्धिष्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, संदीप कदम, रवींद्र पवार, विद्याधर कदम आदी उपस्थित होते. 

वानखेडे म्हणाले, समाजामध्ये अंधश्रद्धा वाढत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे काम भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. याकरिता गावोगावी, वाडीवस्तांवर अंद्धश्रद्धा निर्मूलनासाठी शिबिरे घेतली पाहिजेत. कारण समाजातील शिक्षित किंवा अशिक्षित लोकांच्या मनात व डोक्यात अंधश्रद्धा भरलेली असून ती दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन शिबिरे घेणे अत्यंत गरजेचे आहे. नैतिकता हा बौद्ध समाजाचा सिद्धांत आहेत. हा सिद्धांत भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोपासला पाहिजे. वस्तू आपली नसेल तर त्याला हात लावू नये, हे कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व विकसित केले पाहिजे, हे नेतृत्व विकसित करताना ज्ञान व प्रज्ञावान होणे गरजेचे आहे. महासभेचे काम करताना समस्या, अडीअडचणी, संकटे, आव्हाने येणार आहेत. त्याचा सामना कार्यकर्त्यांनी धीरोदत्तपणे केले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमची महासभेचे काम तळगाळापर्यंच पोहोचविण्याचे काम करताना सतत मनन व चिंतन करून धाडसीवृत्ती ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी नेहमीच दूरदृष्टी ठेवावी, दूरदृष्टीमुळे तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यशस्वी होणार आहात, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

दिवसभर चाललेल्या शिबिरात व्यक्तिमत्व विकासाचे पैलू, उद्दिष्ट पूर्ण कसे करावे, नेतृत्व गुण व प्रकार या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकासाची बौद्धीक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी शिबिरार्थींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन संजय पेंडुरकर यांनी केले. शिबिरात १३० हून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते.