
वेंगुर्ला:
शिरोडा खाजनभाटी येथे एक उपद्रवी माकड गेल्या एक महिन्यापूर्वी पासून गावातील महिला, वयोवृद्ध, लहान मुले यांच्यावर हल्ला करत असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान सोमवारी (२७ मार्च) येथीलच सगुण शंकर नाईक ( वय 60) हे आपल्या घरच्या परिसरात वावरत असताना माकडाने अचानक धावत येऊन त्यांच्या पायाचा चावा घेतल्याने ते जखमी झाले. यामुळे वन विभागाने उपद्रवी माकडाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास शिरोडा भाजप कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आतापर्यंत या माकडाने अचानक हल्ला करून ५ ग्रामस्थांना जखमी केले आहे. यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. सोमवारी सगुण शंकर नाईक यांच्यावर माकडाने अचानक धावत येऊन त्यांच्या पायाचा चावा घेतल्याने ते जखमी झाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही बातमी समजताच शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, माजी ग्रा. प. सदस्य प्राची नाईक यांनी खाजनभाटी वाडीत जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. या पूर्वी सदर माकडाने कीर्ती आमरे , मिलन आमरे , कु. प्रिन्स आमरे यांच्या वर अचानक हल्ला चढवून त्यांना जखमी केले होते. तसेच बऱ्याच महिलांचा पाठलाग करून उपद्रव केला होता.
माकडाच्या या उपद्रवामुळे शाळेत जाणाऱ्या मुलां मध्ये , तसेच काजू तोडणी साठी जाणाऱ्या लोकांमध्ये व महिलांमध्ये भीती निर्माण झालेली आहे . अशी माहिती माजी ग्रा पं सदस्या सौ प्राची नाईक व प्रकाश आमरे यांनी दिली आहे. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी वरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून यापूर्वी पाहणी झाली असून त्यांना अद्याप सदर माकड पकडण्यात अपयश आलेले आहे. दरम्यान सदर माकडाला त्वरित पकडून ग्रामस्थां मधील भीतीचे वातावरण लवकरात लवकर दूर करावे अशी मागणी मनोज उगवेकर व राहुल गावडे यांनी वनविभागा कडे केली आहे.