घरात घुसून महिलेचा विनयभंग ; ठार मारण्याची धमकी

Edited by: लवू परब
Published on: November 19, 2024 18:52 PM
views 822  views

दोडामार्ग : रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलेचा विनयभंग करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी साटेली - भेडशी येथील रेहान कमर लतिफ या ३८ वर्षीय युवकांवर दोडामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ऐन निवडणूक कालावधीत काल सोमवार रात्रौ घडलेल्या या प्रकाराने दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

याबाबत दोडामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काल सोमवारी रात्री साधारणतः ११.४५ ते १२ वाजण्याच्या दरम्यान वरील आरोपीने एका विवाहित महिलेशी असलेल्या ओळखीचा गैर फायदा घेऊन आपल्याशी लग्न करावे यासाठी तिच्या मनाविरुद्ध जवळीक साधून फोन करत तसेच मेसेज करत त्रास देत होता. या महिला आपल्या मेसेजचा रिप्लाय देत नाही याचा राग ठेऊन काल सोमवारी रात्री महिलेच्या घरात घुसला. व तिच्या पतीस ढकलत अंगावर धावत गेला. एवढेच नव्हे तर सदर महिलेचा विनयभंग करत तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तू माझ्याशी लग्न कसे करत नाहीस ते बघतो रेहान काय चिज आहे हे तुला दाखवतो. असे म्हणत विवाहितेशी झोंबाझोंबी केली. तसेच हाताच्या थापटाने मारहाण करून मारण्याची धमकी दिली. या विवाहितेची मुलगी सोडविण्याकरता गेली असता तिला पण बाजूला ढकलून दिले. याप्रकरणी युवकावर दोडामार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३३, १३१,७४, ७५,  ७६, ११५ ( २), ३५१ ( २), ( ३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.