
मंडणगड : शाळा सुटल्यानंतर घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुक्यातील बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी तक्रारीशी संबंधित असणाऱ्या मुख्य संशयितांसह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात नमूद तक्रारीतील माहितीनुसार, ता.२३ जुलै रोजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील संशयित शिक्षकाने शाळा सुटल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनीला शाळेत असलेला मोबाईल चार्जर घेवून घरी बोलावून घेतले. सोबत आलेल्या त्यातील एका मुलीला दुकानावर काही साहित्य आणण्यासाठी पाठवले. यानंतर दुसऱ्या मुलीला हॉलमध्ये बोलावून तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे अप्रिय कृत्य केले. घाबरून त्या मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी सदर घटनेची माहिती तिच्या पालकांना दिली. पालकांनी यासंदर्भात तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवली. मात्र गावातील काही व्यक्तींनी त्यांना असे करण्यास मज्जाव करून असे करू नये यासाठी विविध विषयांची भिती दाखविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर तब्बल दीड महिन्यानंतर ता. १९ सप्टेंबर रोजी यासंदर्भात पालकांनी बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीच्या अनुषंगाने संशयित निलेश अशोक कांबळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ चे कलम ७४, बालकांचे लैंगिक आपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२, २१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच तक्रार होवू नये म्हणून दबाव आणल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे, राकेश साळुंखे या नऊ जणांविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी बाणकोट पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांना विचारले असता त्यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली.
मंडणगड, दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या या दुष्कृत्य बाबत मंडणगड दौऱ्यावर आलेल्या राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर घटनेसंदर्भात कडक शिक्षा होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.










