
कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ग्रामसडक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ला येथील अनेक रस्त्यांवरील खड्डे आणि नवीन रस्त्यांच्या कामांविषयी चर्चा करण्यात आली. निधीअभावी नवीन कामांना सुरुवात करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
मनसेने कविलकाटे येथील साई मंदिर रोडवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याची आणि केरवडे तर्फ माणगाव येथे नवीन रस्ता बनवण्याची प्रमुख मागणी केली आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोऱ्या खचल्या आहेत आणि खड्डे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. हे रस्ते ग्रामसडक योजनेच्या नवीन कार्यक्रमाची वाट पाहत आहेत.
या भेटीदरम्यान मनसेने काही प्रमुख मुद्दे अधिकाऱ्यांसमोर मांडले. यामध्ये, ठेकेदारांच्या जोखीम कालावधीत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, ज्या कामांचे कार्यारंभ आदेश (work order) झाले आहेत ती कामे लवकर पूर्ण करावीत, तसेच स्थानिक ठेकेदारांची सिंडिकेट असल्यास बाहेरील ठेकेदारांना संधी द्यावी, अशा मागण्यांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, नवीन कामांसाठी निधी मिळवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करण्याची विनंतीही मनसेने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज, उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, सुबोध परब, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष यतिन माजगावकर, हेदुळ शाखाध्यक्ष सुरज पुजारे आणि अनिकेत ठाकूर उपस्थित होते.










