भुमिगत विज वाहिन्यांसाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा : ॲड. अनिल केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: May 25, 2025 16:34 PM
views 37  views

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्हयात भुमिगत विज वाहिन्या टाकण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे. पहिल्याच पावसात वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या मर्यादा उघड्या पडल्यात व्यापारी उद्योजक, कारखानदार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील अनेक गावे अंधारात गेल्याचे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, गेले काही दिवस जिल्हयात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडून विज खांब वाकून अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. शहरी भागात देखील दिवसभर विज गायब असल्यामुळे व्यापारी दुकानदार उद्योजक यांचे लाखो रुपयांचे आर्थिक स्वरूपाचे नुकसान झालेले आहे. तसेच विद्युत यंत्रणेचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. वादळी पाऊस पडल्यावर विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनतेला नेमकी माहिती देण्याऐवजी वीज कंपनीच्या कार्यालयांचे दूरध्वनी उचलून बाजुला ठेवले जातात. तर अधिकारी वर्ग आपले मोबाईल एकतर बंद करून ठेवतात अथवा बिझी मोडवर ठेवतात. त्यामुळे नेमकी माहिती मिळत नसल्याने जनतेचा अनेक वेळा उद्रेक होत असल्याचे पहायला मिळत आहे. आपला जिल्हा हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे. अनेक विद्युत यंत्रे ही जंगलमय भागात बसवलेली आहे. विद्युत तारा देखील जंगलमय भागातून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा झाडे पडून या तारा तुटून पडतात तसेच विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारा जमिनीवर पडून आग लागून त्यात शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. तसेच या विद्युत तारा अंगावर पडून पाळीव जनावरे देखील प्राणास मुकलेली आहेत. त्यामुळे वारंवार होणारे हे नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ जिल्हा असल्याने विशेषबाब म्हणून संपूर्ण जिल्ह्यात भुमिगत वीज तारा टाकून त्या मार्फत विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.