सावंतवाडीतील विक्रेत्यांवरील कारवाईचा मनसेने केला निषेध

Edited by: विनायक गांवस
Published on: September 24, 2025 17:09 PM
views 167  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात स्थानिक भाजी आणि मासे विक्रेत्यांवर नगरपालिकेकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परप्रांतीय विक्रेत्यांना अभय दिले जात असताना स्थानिक विक्रेत्यांवर होणाऱ्या अन्यायावर तातडीने तोडगा काढला जावा. अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष राजू कासकर यांनी दिला आहे.


श्री कासकर यांनी नगरपरिषद सावंतवाडीला याबाबत एक निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या गावांमधून शहरात येणाऱ्या गरीब महिला आणि स्थानिक भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करू दिला जात नाही. दुसरीकडे, परप्रांतीय विक्रेत्यांना मात्र मोकळीक दिली जात आहे. या दुजाभावामुळे स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. स्थानिक भाजी आणि मासे विक्रेत्यांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. जर या प्रकरणी योग्य तोडगा काढला नाही आणि परप्रांतीय विक्रेत्यांना अभय देणे सुरूच राहिले, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संबंधित नगरपालिकाच जबाबदार असेल, असेही मनसेने स्पष्ट केले आहे.