...अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन : संतोष मयेकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 21, 2024 12:37 PM
views 423  views

देवगड : अवैध वाळू भरून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणारा डंपर कोळंब येथे पलटी होऊन अपघात झाला. अशीच अवैध वाळू वाहतूक आचरा दहिबाव दाभोळे मार्गे भरगाव वेगाने राजरोसपणे कोणालाही न जुमानता राञी 8 नंतर चालू असते. यासर्व प्रकारास देवगड महसूल प्रशासन जबाबदार आहे. शासनाची अधिकृत वाळू उपसा बंद असुनही कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसुल बुडवुन अवैधरित्या वाळू काढून त्याची देवगड तालुक्यात वाहतूक केली जाते, असा आरोपही मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांनी केला आहे.

अशा भरधाव वेगात चालणाऱ्या डंपरमुळे याआधी अनेक अपघात झाले आहेत. निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. रात्रीच्या वेळेस बेदरकारपणे डंपर चालू असल्याने सामान्य नागरिक चालताना, वाहन चालवताना भितीच्या छायेत वावरत आहेत. अपघात झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा अशा बेजबाबदार वाहतुकीवर लक्ष घालून कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी दिला आहे. याबाबत लवकरच तहसीलदार, प्रांत अधिकारी ( कणकवली ), देवगड पोलीस ठाणे यांना मनसे मार्फत निवेदन देण्यात येणार असल्याचे संतोष मयेकर यांनी सांगितले आहे.