एमएनजीएल कंपनीच्या ठेकेदारांची मुजोरगिरी सुरूच !

सार्वजनिक बांधकाम खात्याची सोयीस्करपणे डोळेझाक
Edited by: संदीप देसाई
Published on: November 26, 2022 16:49 PM
views 437  views

दोडामार्ग : दोडामार्ग ते बांदा राज्यमार्गावर एमएनजीएल कंपनीच्या ठेकेदारांची मुजोरगिरी सुरूच असून त्याकडे रस्त्यांची मालक असलेली सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे. कंपनीचे ठेकेदार रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर पाईपलाईन घालायची सोडून साईडपट्टी आणि काही ठिकाणी अगदी रस्त्यावर खोदकाम करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. शिवाय रस्त्याचे व साईडपट्टीचे मोठं नुकसान करत आहेत. मात्र त्याकडे साबा खाते दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

   शुक्रवारी रात्री तर बांदा पानवळ येथे रस्त्यावर माती टाकल्याने व अर्धा रस्ता अडविल्याने एका मोठ्या वाहनाला अपघात झाला. त्यामुळे नागरिकांना रहदारी करताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या ठिकाणी याच ठेकदारांनी बीएसएनएल ची फायबर ऑप्टिक केबल तोडल्याने दोडामार्ग तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट यंत्रणा ठप्प झाली होती. हे सारी मुजोरागिरी सुरू असताना या कंपनीच्या थकेदारांना बांधकाम खाते मात्र आपले जावई असल्यासारखे सहकार्य करत आहेत. मुख्य राज्यमार्गावर हे प्रकार सुरू असताना अधिकारी त्यांचेवर कोणतीही कारवाई करत नाहीयेत. विशेष म्हणजे दोडामार्ग बांदा राजमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्ता असूनही त्याकडे डोळेझाक झाल्याने गतवर्षी पावसाळ्यात याच ठेकेदारांनी केलेली मनमानी नागरिकांना सहन करावी लागली, मणेरी येथे रस्ता खचणे, साईडपट्टी वाहून जाणे वाहनांना अपघात घडणे असे प्रकार होऊनही यावेळेस सुद्धा या ठेकेदारांना बांधकाम खाते पाठीशी घालत आहे. अगदी बांदा दोडामार्ग नव्हे तर आयी विर्डी पर्यंत असाच प्रकार सुरू आहे. नागरिक आंदोलन करत असतानाही पुढे काय होते, बांधकाम खाते व आंदोलन नेमके का थांबते हे सारे प्रश्न अनुत्तरित असले तरी या ठेकेदारांच्या मुजोरागिरीला आळा घालणारे खाते गप्प कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.