BIG BREAKING | आमदार वैभव नाईक यांची 'एसीबी'कडुन चौकशी

पुढील चौकशी होणार 12 ऑक्टोबर रोजी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 21:19 PM
views 855  views

कणकवली : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कटटर समर्थक व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची आज सायंकाळी रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन चौकशी करण्यात आली. त्यांच्या कणकवली इथल्या निवासस्थानी एसीबीचे पथक सायंकाळी दाखल झाले. त्यानंतर काही तास ही चौकशी सुरू होती. दरम्यान, ही चौकशी म्हणजे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. 

नुकतेच मुंबईत झालेले दोन दसरा मेळावे आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादामुळे शिवसेनेअंतर्गत दोन गटात मोठा संघर्ष चालु आहे. त्यातच दसरा मेळाव्यातील उध्दव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आपल्या नेहमीच्या राणे स्टाईलने ठाकरे यांचा त्यांनी समाचार घेतला. आपल्या खुनाची सुपारी दिल्याचेही जाहिररित्या नावांसह सांगितले. केंद्रीय मंत्री राणे यांच्या या आरोपांना उत्तर देताना श्रीधर नाईकांचा खुनाचा संदर्भ घेत आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, या आरोप प्रत्यारोपांवर जोरदार चर्चा सुरू असतानाच सायंकाळी आमदार वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीची बातमी धडकली. 

यासंदर्भात रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक सुशांत चव्हाण यांनी 3 ऑक्टोबरला पत्र दिले होते. त्यातील मजकुरानुसार, 1 जानेवारी 2002 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीतील उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता यासंदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे. पुढील चौकशीसाठी आमदार वैभव नाईक यांना 12 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, या चौकशीसंदर्भात प्रतिक्रीया देताना आमदार वैभव नाईक म्हणाले की, मी राजकारण आणि समाजकारणात आहे. त्याचबरोबर व्यवसायातही आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील सर्व तपासणी त्या त्या विभागामार्फत दरवर्षी होत राहते. ही चौकशी गृहखात्याकडुन म्हणजेच भाजपकडुन सुरू आहे. परंतु मी असल्या कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही. चौकशीला सामोरे जाणार.