आमदार नितेश राणेंचा दणका

‘त्या’ कंपनीची जाहीर माफी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 08, 2022 19:36 PM
views 306  views

बांदा :  भाजपचे आमदार नितेश राणेंच्या दणक्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचा जाहिरातीत अवमान करणार्‍या कापूर कंपनीच्या मालकाने अखेर समस्त भाविकांची जाहीर माफी मागितली आहे. तसा माफीनामाचा  व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित केला आहे. बांद्यातील व्यापारी व नागरिकांनी संबंधित कंपनीची तक्रार आ. नितेश राणे यांच्याकडे केली होती. तसेच संबंधित कंपनीचा कापूर विक्री व वापर बंद केला होता. आ. नितेश राणे यांनी बांदावासियांच्या त्याग आंदोलनाची दखल घेत कंपनीला माफी मागण्यास भाग पाडण्याचे अभिवचन दिले होते.

कापूर बनविणार्‍या मंगलम ऑर्गेनिक्स या कंपनीने दीड वर्षांपूर्वी कापूरची जाहिरात टेलिव्हिजनवर प्रकाशित केली होती. त्यात प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करण्यात आला होता. त्यावरुन भक्तगणांमध्ये नाराजी पसरली होती. बांदा शहरातील सर्व देवस्थाने, व्यापारी व नागरिकांनी सदर कापूर त्याग आंदोलन सुरु केले होते. बांदा सरपंच अक्रम खान यांनी या आंदोलनाची माहिती आ. नितेश राणे यांना दिल्यानंतर ते खूप प्रभावित झाले. बांदा येथे समस्त आंदोलकांची भेट घेत त्यांचे कौतुकही केले होते. सदर कंपनीच्या मालकाला माफी मागण्यास भाग पाडू. लवकरच तसे चित्र दिसेल, असा ठोस शब्दही आ. राणेंनी दिला होता.

    मंगलम ऑर्गेनिक्सचे मालक पंकज दुधोजवाला यांनी तसा माफीचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. त्यात त्यांनी समस्त भाविकांची जाहीर माफी मागितली आहे. भक्तांच्या भावना दुखावण्याचा आमच्या कंपनीचा हेतू नव्हता. सदर जाहिरात हटविण्यात आली असून समस्त भक्तगणांची माफी मागत असल्याचे म्हटले आहे. याबाबत बांद्यातील व्यापारी, आंदोलक व नागरिकांनी आ. नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.