
शिवापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टींग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. शिवापूर सह पंचक्रोशीतील विकास कामांना अधिक गतिमान केले जाईल. आजी- माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्याचे संधी आमदार म्हणून मला मिळते हे मी माझे भाग्य समजतो यासाठीच नियतीने मला आमदार केले आहे अशी माझी भावना आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी शिवापूर येथील कार्यक्रमात केले.
देशासाठी होतात्म पत्करलेल्या शिवापूर गावच्या शहीद दहा सुपुत्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या रणस्तंभाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी शिवापूर ग्रामपंचायत येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईरे,श्री.नाईक, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, माजी सैनिक संघटनेचे शिवराम जोशी, विष्णू ताम्हाणेकर, माजी सभापती मोहन सावंत,बाबुराव कविटकर, सरपंच सुनिता शेडगे उपसरपंच महेंद्र राऊळ, निवृत्त सेनापदक प्राप्त माजी सैनिक बापू खरात आदी उपस्थित होते.
आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की, देशात आज युध्द जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सैनिक देशासाठी कीती महत्वाचा आहे ते आज कळते. शिवापूर सारख्या गावातील दहा सुपुत्र देशासाठी हुतात्मा होतात ही बाब त्यांच्या कुटुंबियांसाठी दु: खद घटना असली तरी गावासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.यावेळी रणस्तभाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार निलेश राणे,विकासाबाबत म्हणाले की, शिवापूर- शिरशिंगे रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. त्यासाठी माजी सभापती मोहन सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यामुळे यश आले आहे. त्यामुळे वन संज्ञेचा प्रश्न आता सुटला आहे.तसेच आंजिवडे घाट रस्त्यासाठी प्रयत्न केले जातील, शिवापूर पंचक्रोशीतील लाईटचा प्रश्न निकाली काढला जाईल,असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले.यावेळी पंचक्रोशीतील विविध विकास कामांची उद्घाटन व भुमिपुजन ऑनलाईन पध्दतीने आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आली., रणस्तभासाठी लागणारे छत आपल्या निधीतून उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी १५० माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शहीद झालेल्या दहा सैनिक कुटुंबातील व्यक्तिंचा सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. रणस्तभासाठी जमिन देणाऱे सुरेश नाईक यांचाही सत्कार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. और वकील क्षेत्रात नोटरीची सनद मिळवलेल्या एडवोकेट सुधीर राऊळ, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष झालेल्या पत्रकार संतोष राऊळ, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर यांचा यावेळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार माजी सैनिक सखाराम साळोखे, पांडुरंग राऊळ,बुधाजी गुंजाळ,रमेश बांग,दिलीप शेडगे, प्रभाकर राऊळ,तुकाराम राऊळ,सुरेश राऊळ,विनोद राऊळ,उत्तम पाटकर,बाळा पाटकर,महेश शिंदे,लाडू शेडगे,विठ्ठल राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक माजी सभापती मोहन सावंत यांनी केले .तर आभार संतोष राऊळ यांनी मानले.