
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आज बुधवारी कणकवलीत येत आहेत. श्री. राणे हे माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. एकीकडे कणकवली नगरपंचायतीत शहरविकास आघाडी स्थापन झाली असून त्यात शिंदे शिवसेनेचे नेतेही सहभागी आहेत. तर नीलेश राणेंनी यापूर्वीच शहर विकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे विधान केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज कणकवलीत येऊन निलेश राणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणूक आता दिवसेंदिवस रंगत येऊ लागली असून शहर विकास आघाडीमध्ये भाजपाविरोधी बहुतांशी सर्वच पक्ष एकत्र येत क्रांतिकारी विकास पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत. शिंदे शिवसेना देखील या पॅनलमध्ये सहभागी आहे.
दरम्यान आज संध्याकाळी निलेश राणे यांचा कणकवली दौरा असून यावेळी ते पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शहरविकास आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी देखील निलेश राणे चर्चा करणार का? कणकवली नगरपंचायत निवडणुकीत निलेश राणेंचा 'रोल' काय असणार, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.












