मी आणि दत्ता सामंत टार्गेटवर ; काय म्हणाले आ. निलेश राणे ?

आता कोणतीही तडजोड नाही
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 30, 2025 17:49 PM
views 931  views

कुडाळ : मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच, त्यासोबत कुडाळ मालवण मतदार संघातील 15 जिल्हा मतदार संघात स्वबळावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आणणार असा निर्धार करत आता कोणतीही तडजोड होणार नाही असा इशारा आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील शिवसेना मेळाव्यात दिला. 


आमदार निलेश राणे म्हणाले, संपर्कमंत्री म्हणून उदय सामंत यांनी सिंधुदुर्गला जपण्याचे काम करत आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढायचे आहे असे मी कधीही म्हटले नाही. युती व्हावी यासाठी अनेकांशी संपर्क साधला. मात्र, मित्रपक्षाकडून स्वबळाची भाषा आली त्यानंतर आम्ही जाहीर केलं. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही. या मतदार संघात भाजपामध्ये असताना काम सुरु केलं. विधानसभा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली. जो म्हणून असतो तोच उमेदवार असतो असं सांगण्यात आले. म्हणून सर्वच खर्च केला. नंतर हा खर्च पक्षाने केला असं सांगण्यात आले याचं वाईट वाटलं. तिकडे राजन तेली सुद्धा सावंतवाडी विधानसभा प्रमुख होते. आमच्या दोघांचीही विकेट पडली. निलेश राणे उमेदवार असतील तर वैभव नाईक निवडून येतील असे सर्वच सांगत होते. भाजपमध्ये सुद्धा आपले सहकारी आहेत. ज्यावेळी दीपक केसरकर सांगतील त्यावेळी मी त्यांचा निर्णय घेईन . 

या मतदार संघात 15 पैकी 15 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार. आता तडजोड नाही. माझ्या मतदार संघात मी आणि दत्ता सामंत टार्गेटवर आहोत. मित्र पक्षाकडून सर्वच खर्चाची तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसारखी तयारी त्यांनी आता जिल्हा परिषदेत केली आहे. ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे प्रामाणिक काम कर ही राणे साहेबांची शिकवण. सभागृहात सुद्धा शिवसेने विरोधात बोललं तरी त्यावर तुटून पडतो. शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदेंसोबत राहणार. युती नाही झाली तर स्वबळावर सर्वांना निवडून आणणार. आता घाबरायची गरज नाही. अनेक शक्ती वापरली जाईल या निवडणुकीत. मालवणची नगरपरिषदही जिंकणार. जिल्हा परिषदेवर शिवसनेचा भगवा फडकवणारच. निवडणुका जिंकलो तर ताठ मानेने कामे होतील. उमेदवारी कोणालाही मिळेल तरी धनुष्यबाण निवडून आला पाहिजे. कुठेही तडजोड करू नका असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.