सिंधुदुर्गातील समस्यांचा आ. नाईकांनी वाचला पाढा

विविध प्रश्नांकडे वेधलं सभागृहाचं लक्ष
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 20, 2023 14:00 PM
views 145  views

नागपूर : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावास आमदार वैभव नाईक यांनी पाठींबा देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठविला. यामध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे प्रश्न, गावागावात मूलभूत सुविधांची झालेली वाणवा, सुरक्षा रक्षक मंडळातील स्थानिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न, कुडाळ महिला बाल रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, एमआरजीएस योजनेची उदासीनता, हवामान केंद्रांची आवश्यकता, पीक पाहणीमध्ये रखडलेल्या नोंदी याकडे सरकारचे लक्ष वेधले.

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समिती मधून सरकारने केलेला खर्च त्यामुळे मूलभूत सुविधांची झालेली वानवा, कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे त्यांच्या सुरक्षेची हमी घेऊन अपघातप्रसंगी त्यांना सरकरकडून ठोस मदत करणे. कुडाळ महिला बाल रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, त्याठिकाणी कायमस्वरूपी भुलतज्ञ नसणे तसेच  कंत्राटी डॉक्टरांचे थकविलेले पगार याकडे आ. वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळातील स्थानिक कर्मचाऱ्यांना त्या-त्या भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांना डावलण्यात येऊ नये.त्यांना ड्रेस कोड करावा. एमआरजीएस योजनेतील अटी शर्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची अंमलबाजवणी होत नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेच्या निकषात बदल करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक हवामान केंद्रे बंद असल्याने शेतकरी आंबा, काजू, पीक विमा रक्कमेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक मंडळात जास्तीत जास्त हवामान केंद्रे  शासनाने द्यावीत. पीक पाहणीमध्ये नोंदी होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांपासून शेतकरी वंचित राहत आहेत याबाबत आ.वैभव नाईक यांनी आवाज उठविला.