आमदार म्हात्रे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार

शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सोडवून न्याय मिळवून देणार -आ. म्हात्रे यांची ग्वाही
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 06, 2023 09:26 AM
views 488  views

सावंतवाडी : कोकण शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, शिक्षक परिषद, मराठा शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग, कास्ट्राईब संघटना, अध्यापक संघटना, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, विनाअनुदानित शिक्षक संघटना, अध्यापक विद्यालय संघटना, शिक्षक सेना सिंधुदुर्ग संघटना व अन्य विविध संघटनेमार्फत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही आ. म्हात्रे यांनी दिली.

जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅलच्या सभागृहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे कार्यकारणी सदस्य  एम. जी. मातोंडकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरूदास कुसगावकर, टी. के. पाटील, शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर अध्यक्ष तथा मुख्याध्यापक महामंडळ उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील, जिल्हा अध्यापक संघाचे टी. के. पाटील, गुरूनाथ पेडणेकर, श्री. मयेकर मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत, जिल्हा कास्ट्राईब संघटना अध्यक्ष आकाश तांबे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, श्री. वाळके सर, शिक्षक परिषदचे सलीम तकीलदार, भाजपा शिक्षक आघाडीचे सुरेश चौकेकर, कुडाळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष दीपक आळवे, जिल्हा शिक्षक सेना अध्यक्ष  कमलेश गोसावी, माजी मुख्याध्यापक विवेकानंद बालम, रघुनाथ  घोगळे, रवींद्र सावंत, श्री. डामरी सर,  ठाकूर सर, श्री. दहिबांवकर सर, चोडणकर सर, मुख्याध्यापक संघाचे माजी पदाधिकारी काळे सर, रमण किनळेकर, प्रदीप शिंदे, श्री. मराठे सर,  प्रा. नागेश कदम आदींसह जिल्हाभरातील मुख्याध्यापक संघ व विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ. म्हात्रे म्हणाले, हा माझा एकट्याचा विजय नसून सर्व शिक्षकांचा विजय आहे. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा मी आमदार आहे. या निवडणुकीत कोकणातील सर्व शिक्षक माझ्या पाठीशी राहीले प्रेम, विश्वास दिला आणि राज्यभरातील ३३ संघटना, कोकणातील राजकीय नेतेमंडळी, हितचिंतक यांनी भक्कम पाठबळ दिले. माझ्या विजयासाठी जो-जो घटक माझ्या पाठीशी उभा राहिला, त्या सर्वाचे आपण आभार मानतो. प्रत्येक मुख्याध्यापक हा शिक्षकच असतो. या शिक्षकांनी एका शिक्षकाला मोठ्या विश्वासाने आमदार बनविले आहे, त्या विश्वासाला आपण बांधिल आहे. कोकणातील शिक्षकांनी मला दिलेले प्रेम, दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थकी लावेन. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासह संस्था चालकांचे अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षकांना हक्काची पेन्शन १०० टक्के मिळवून देऊ. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अधिक सोपा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांना सर्वांना न्याय मिळवून देण्याचे आपले प्रयत्न राहतील. शिक्षणातील सर्व प्रश्न दूर करून, शिक्षकांची भरती, विद्यार्थी पटसंख्या वाढ यावर भर दिला जाईल.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे-जे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या माध्यमातून प्राधान्याने सोडविले जातील. त्यासाठी जिल्ह्यात लवकरच कार्यालय सुरू केले जाणार आहे. दर दोन महिन्यांनी आपण जिल्ह्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शाळानिहाय दौरा करणार आहे. तसेच आपला आमदार फंडातील निधी हा शाळांच्या विकासासाठी देणार असल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले.

श्री. मातोंडकर यांनी आ. म्हात्रे आमदार म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करीत असताना शिक्षणाचे समग्र प्रश्न ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करतील.

वामन तर्फे म्हणाले, आ. म्हात्रे यांच्या रूपाने प्रत्येक शिक्षक आमदार झाला आहे. या निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. आ. म्हात्रे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक दृष्ट्या कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.


दिनेश म्हाडगुत यांनी जुन्या पेन्शन बरोबरच कोकण बोर्डाच्या धर्तीवर कोकणात स्वतंत्र कोकण क्रिडा विभाग व्हावा तसेच पवित्र पोर्टल मध्ये क्रिडा शिक्षक पद समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती केली.

याप्रसंगी व्ही. जी. पोवार, दीपक आळवे, दिनेश म्हाडगुत, श्री. शितोळे, कमलेश गोसावी, सुरेश चौकेकर, आकाश तांबे, गुरूनाथ पेडणेकर, श्री. धावरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन तर्फे, सूत्रसंचालन निलेश महेंद्रेकर यांनी केले, तर आभार गुरुदास कुसगावाकर यांनी मानले.