
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूलला आमदार महेश सावंत यांनि सदिच्छा भेट दिली असून, ग्रामीण शिक्षणाची त्यांनी यावेळी दखल घेतलीआहे. त्यामुळे शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयासाठी हा दिवस अत्यंत गौरवशाली ठरला आहे.
माहिमचे आमदार मा. महेश सावंत व त्यांच्या पत्नी यांनी शाळेला सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली. या भेटीमागे १९९४-९५ सालच्या एस एस सी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष पुढाकार होता.तृप्ती साटम, हेमंत देसाई, राजू जाधव आणि अमित साळगावकर या माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आमदारांनी ही भेट घेतली. आमदारांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुंबई कार्यकारिणीचे सदस्य व माजी विद्यार्थी हेमंत देसाई, तृप्ती साटम, राजू जाधव व अमित साळगावकर उपस्थित होते.
शाळेचे चेअरमन विजयकुमार कदम यांनी आमदार महोदयांना शाळेतील सुरू असलेल्या उपक्रमांची, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची, आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षणासाठी चाललेले प्रयत्न पाहून आमदार महेश सावंत भारावून गेले.त्या वेळी त्यांनी या शैक्षणिक चळवळीला अधिक वेगाने चालना मिळावी यासाठी शासनस्तरावर तसेच खाजगी माध्यमातून भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. “शिक्षण हीच खरी ताकद आहे आणि अशा ग्रामीण भागातील प्रामाणिक उपक्रमांना माझा पूर्ण पाठिंबा राहील,” असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.या भेटीने शाळेच्या वाटचालीला एक नवे बळ लाभले आहे. माजी विद्यार्थ्यांचे प्रेम, आमदार महोदयांची आस्था आणि संस्थेच्या कटीबद्धतेमुळे शिरगाव हायस्कूलचा उज्वल भविष्यात नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.