
देवगड : कुणकेश्वर व मिठमुंबरी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वच्छता मोहीम, प्रभावी पाणी व्यवस्थापन, हरित उपक्रम तसेच ग्रामसभेमधील सक्रिय लोकसहभाग या क्षेत्रांत या गावांनी विशेष कामगिरी बजावली आहे.
या सर्व उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळावी यासाठी देवगडचा रिल स्टार ऋत्विक धुरी यांनी मिठमुंबरी व कुणकेश्वर गावाला भेट देत विविध विकासकामांवर आधारित रिल्स तयार केल्या. त्यांच्या भेटीमुळे गावातील सकारात्मक कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित होणार आहे.
दरम्यान, मिठमुंबरी ग्रामपंचायतीने नुकताच सन २०२१-२२ या वर्षातील राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल नवी मुंबई बेलापूर येथे विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.या यशाबद्दल विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत)तुषार हळदणकर यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.












