
कुडाळ : उत्तरप्रदेशातील मीना सोनु ही ३८ वर्षांची तरुणी पाच महिन्यांपुर्वी ९ मार्च २०२४ ला मानसिक अवस्थेत घरातून भरकटली. तीन दिवसांनी ती थेट पोहचली कणकवलीमधे. १२ मार्च,२०२४ ला कणकवली पोलीस ठाण्यात संविता आश्रमात दाखल करण्यात आलेल्या मिना सोनु हिला तीचे पती सोनु व वडिल किशोरी राम यांच्या ताब्यात देवून कुटुंबाची भेट घडवून आणली.
मीनाच्या कुटुंबियांनी तिचे माहेरचे घर असलेल्या आग्रा जिल्ह्यातील जगदिशपुरा पोलीस ठाण्यात १० मार्च, २४ ला हरवल्याची तक्रार दाखल करून बेदई परिसरात खूप शोध घेतला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग सह गोवा राज्यात रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब हे त्यांच्या टिमसह गेले ११ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. संदिप यांचे सहकारी विश्वस्त किसन चौरे व संविता आश्रमच्या टिमने मिनाने दिलेल्या त्रोटक माहितीवरून तीन महिन्यांहून अधिक काळात तीच्या मु.बेदई ता.सादाबाद जि.महामायानगर या सासरच्या गावामधे गुगल सर्च आधारे वारंवार शोध घेतला. अखेरिस मीनाच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यात यश मिळविले.
संविता आश्रमातून गुगल आधारे मीनाचे गाव व कुटुंबियांचा शोध घेवून पुनर्मिलन करण्यासाठी गेले तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रक्रियेत वेदई ग्रामपंचायतच्या माजी ग्राम सचिव सुजाता झा , सादाबादचे प्रांताधिकारी संजय कुमार व वेदईचे सरपंच मोहित चौहान यांचे अत्यंत मोलाचे सहाय्य झाले.
तब्बल पाच महिने घर आणि कुटुंबापासून दुरावलेली मिना ज्या क्षणी पती सोनु आणि वडिल किशोरी राम यांना भेटली तेव्हा तिच्या अश्रुंचा बांध फुटला. संविता आश्रमात उपस्थित कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले. निरोप देते वेळी संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, आशिष कांबळी, विजया कांबळी, आरती वायंगणकर, सुवर्णा कोकरे, प्रतिक्षा चव्हाण, मयुरी परब हे उपस्थित होते.