मंत्री नितेश राणेंची सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारणीची मागणी

Edited by: ब्युरो
Published on: January 15, 2025 11:49 AM
views 96  views

सिंधुदुर्ग : मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी केलीय. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ आहे.जिल्ह्याच्या एका बाजूला समुद्र किनारा तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि जंगल आहे.सिंधुदुर्गातील जंगलात अनेक प्रकारचे वन्यप्राणी व विविध जाती प्रजातीचे पक्षी आढळून येतात. जर जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय निर्माण झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल.त्यामुळे  स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.प्राणी संग्रहालय झाल्यास जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन जिल्हावासीयांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.याचा निवेदनात उल्लेख करून मंत्री नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालयाची मागणी केली आहे.

प्राणी संग्रहालयाला लागणारी आवश्यक जागा सिंधुदुर्गात उपलब्ध असून संबंधितांना मंजूरीसाठी आदेश देण्याची विनंती नितेश राणे यांनी वनमंत्र्यांजवळ केली.