मंत्री नितेश राणेंनी केली ठेकेदाराची कान उघडणी

Edited by: मनोज पवार
Published on: April 26, 2025 14:53 PM
views 235  views

दापोली : दापोली तालुक्यातील बंदर विभागाच्या अडखळ येथील जेटीवर दोन गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मस्त्यविकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी काल सायंकाळी अडखळ जेटीवर जावून पाहणी केली यावेळी त्यांनी या जेटीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कान उघडणी करत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली. 

मागील महिन्यात अडखळ जेटीवर वाहने उभी करण्यावरून  दोन गटात हाणामारी झाली होती. या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी कोणी परवानगी दिली असा प्रश्न राणे यांनी बंदर विभागाच्या अधिकार्यांना केला.  ही जागा बंदर विभागाची असून येथे कोणतीही वाहने यापुढे उभी राहणार नाहीत याची  दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या.  यापुढे या जेटीवर कोणी वाहने उभी केली तर मी स्वत येऊन ती वाहने खाडीत लोटून टाकेन असा सज्जड दमही त्यांनी दिला. शासनाच्या जागेचा वापर शासकीय कामासाठीच झाला पाहिजे, त्यात अधिकाऱ्यांनी कसूर केल्यास त्यांच्यावर थेट कारवाईच केली जाईल असे राणे म्हणाले. 

आंजर्ले खाडीतील गाळ काढण्याचे काम संथगतीने सुरु असून पावसाळ्याच्या आधी या खाडीत मासेमारी नौका सुरक्षेसाठी  उभ्या केल्या जातात. मात्र वेळेत खाडीतील गाळ काढला नाही तर नौका खाडीत आणायच्या कशा असा सवाल मच्छिमार नेत्यांनी  राणे यांना केला असता खाडीतील गाळ काढणाऱ्या ठेकेदाराला बोलावून घेतले व पावसाळा सुरु होण्याचा अगोदर खाडीमुखाजवळील तसेच खाडीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे असा इशारा मंत्री राणे यांनी ठेकेदाराला दिला.