करुळ घाटातील सर्व कामे १५ जानेवारी पर्यंत पूर्ण करा

सुरक्षितता पाहून मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेऊ : नितेश राणे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 28, 2024 20:40 PM
views 98  views

वैभववाडी : करूळ घाट मार्गातील उर्वरित कामे तातडीने मार्गी लावा. याकरिता अधिकचे मनुष्यबळ वापरून ही सर्व कामे १५ जानेपुर्वी पुर्ण करण्यात यावी. सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात यावी. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. सुरक्षितता पाहून घाट मार्ग वाहतूक खुला करण्यात यावी अशा सूचना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

    मंत्री श्री.राणे यांनी आज (ता.२८) करूळ घाटाची पाहणी केली. यावेळी  जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांतधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. घाटगे, उपभियंता अतुल शिवनिवार, ठेकेदार ओमकार वेल्हाळ,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी,  भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, गुलाबराव चव्हाण, संजय सावंत, बंडया मांजरेकर, राजेंद्र राणे, स्वप्नील खानविलकर, हुसेन लांजेकर, प्रकाश पाटील, महेश संसारे, प्राची तावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    श्री.राणे म्हणाले, करूळ घाटाचे काम गेले वर्षभर सुरु आहे. घाट बंद असल्यामुळे सर्वांचं त्रास सहन करावा लागत आहे. मात्र कोणतेही चांगले काम करताना थोडा त्रास सहन करावा लागतो. त्याप्रमाणे आमच्या जनतेने त्रास, नुकसान सहन केले आहे. त्यामुळे जनतेला वाटले पाहिजे आम्ही त्रास सहन केला. परंतु काम चांगले झाले. असे जनतेला वाटले पाहिजे असे काम करा. कोणी टीका करतात म्हणून घाट सुरु करण्याची घाईगडबडं करून जनतेच्या जीवाशी आम्ही खेळणार नाही. ज्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे. किंवा संरक्षक भिंती अपूर्ण आहेत. दरीकडच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची कामे आधी पूर्ण करा. जोपर्यंत रस्ता वाहतूकसाठी शंभर टक्के सुरक्षित होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरु करता येणार नाही.  १५ जानेवारी पासून वाहतूक सुरु करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विचार करीत आहे. त्या अगोदर आम्ही जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार अशी संयुक्त पाहणी करून निर्णय घेऊ. 


...नाहीतर कारवाई 

गेले वर्षभर बंद असलेला घाट मार्ग सुरू करण्याबाबत १५जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे.या मुदती पुर्वी घाट मार्गातील प्रलंबित सर्व कामे मार्गी लागली पाहिजेत.आता अधिकची मुदत मिळणार नाही.या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश मंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी अनिल पाटील या दोघांनीही दिले.

जिल्हाधिका-यांनी कामातील दाखवल्या त्रुटी

करुळ घाट मार्गात रस्त्याच कॉक्रीटीकरणाचे काम करताना ठेकेदाराने केलेल चुकीचे काम जिल्हाधिकारी पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.काही ठिकाणी रस्त्याचे सिमेंट उखडले असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या भागात हे प्रकार झाले आहेत त्या ठिकाणी तात्काळ सुधारणा करा अशी सूचना श्री पाटील यांनी केली.