मंत्री केसरकरांच्या घरावर ग्रामस्थांची धडक

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 19, 2023 15:02 PM
views 196  views

सावंतवाडी : नऊ महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या असनिये मुख्य रस्ता ते घारपी रस्त्याचे अद्याप काम सुरू न झाल्याने असनिये ग्रामस्थांनी शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक दिली. ४ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ५ जानेवारीला बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

असनिये घारपी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून तीन कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले होते. काम ठेकेदार दिलीप नार्वेकर यांनी घेतले. परंतु, ९ महिने होऊनही काम सुरू झाले नाही. रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य बनला आहे. असनिये गावात शिगमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अद्याप काम सुरू न झाल्याने या उत्सवावरही परिणाम होणार आहे. रस्ता खराब झाल्याने वाहने चालविणे सोडाच चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या कार्यालयावर धडक दिल्याच ग्रामस्थांनी सांगितल. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी  ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत काम करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थ शांत झाले. यावेळी सरपंच रेश्मा सावंत ,उपसरपंच साक्षी सावंत, सामाजिक कार्यकर्ते, संदीप सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.