
सावंतवाडी : आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये पाचशे जणांना रोजगार देणारा औषध उद्योग लवकरच सुरु करण्यात येणार आहे, ही शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची घोषणा जिल्हावासियांबरोबरच पर्यावरणप्रेमींनाही बुचकळ्यात टाकणारी आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्र 'हरित क्षेत्र' असून या ठिकाणी हरित किंवा श्वेत श्रेणीतीलच उद्योग येऊ शकतात. मात्र औषध निर्मिती (फार्मास्युटिकल्स) हा उद्योग लाल श्रेणीतील आहे. यामुळे या घोषणेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले आहे.
याबाबत बोलताना श्री लळीत म्हणाले की, वृत्तपत्रांमध्ये नुकतीच आडाळी औद्योगिक क्षेत्रामध्ये औषध उद्योग आणणार असल्याची श्री. केसरकर यांची घोषणा वाचनात आली. श्री. केसरकर यांच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागतच करतो. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांची चार श्रेणींमध्ये वर्गवारी केली आहे. लाल, केशरी, हरित आणि श्वेत अशी ही वर्गवारी प्रदूषण निर्देशांकानुसार केलेली आहे. ही वर्गवारी त्या त्या उद्योग श्रेणीतील प्रदूषण निर्देशांक (पोल्यूशन इंडेक्स - पी.आय.) लक्षात घेऊन केली आहे. सर्वात जास्त प्रदूषण करणारे उद्योग लाल श्रेणीत तर कमीत कमी प्रदूषण करणारे उद्योग हरित व श्वेत श्रेणीत आहेत.
एखादा उद्योग पाण्याचे, हवेचे किती प्रदूषण करतो, त्यातून किती घातक कचरा निर्माण होतो, तसेच त्या उद्योगासाठी किती साधनसामग्री लागते, यावर ही वर्गवारी अवलंबून आहे. शून्य ते 20 प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग श्वेत श्रेणीत मोडतात. 21 ते 40 प्रदूषण निर्देशांक असलेले गट हरित श्रेणीत मोडतात. 41 ते 60 प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग केशरी गटात मोडतात. 61 पेक्षा जास्त प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग हे लाल श्रेणीमध्ये येतात. औषध उद्योगाचा प्रदूषण निर्देशांक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार 95 एवढा आहे. मंडळाने याबाबत असा स्पष्ट उल्लेख केला आहे की, 'सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या 17 उद्योगांमध्ये औषध उद्योगाचा समावेश होतो. औषध उद्योगातून सर्व प्रकारचे प्रदूषण तीव्र स्वरूपात होते.'
ही सर्व माहिती व चारही श्रेणीत कोणते उद्योग येतात याची सविस्तर यादी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आडाळी येथील हरित औद्योगिक क्षेत्रात आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषध निर्मिती (बॉयलरशिवाय) हे हरित श्रेणीतील प्रकल्प सुरू होऊ शकतात. मात्र लाल श्रेणीतील ऍलोपथी औषध निर्मिती व केशरी श्रेणीतील सर्जिकल व मेडिकल घटकांची निर्मिती होऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे.
आडाळी औद्योगिक क्षेत्र हरित क्षेत्र असून संपूर्ण दोडामार्ग तालुका हा जैवविविधतासंपन्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 22 मार्च 2024 रोजी सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये केला आहे. तसेच अनेक निर्बंध घातले आहेत. दोडामार्ग तालुक्यात न्यायालयाच्या निकालानुसार वृक्षतोड बंदीही लागू आहे. असे असताना सर्वाधिक प्रदूषण निर्देशांक (95) असलेला औषध उद्योग आडाळी येथे कसा चालू होणार? असा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मंत्री महोदयांना या विषयाची माहिती नाही, असे म्हणणे धारिष्ट्याचे होईल. या दौऱ्यामध्ये मंत्री महोदयांसोबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी तरी श्री. केसरकर यांना उद्योगांच्या श्रेणीची, वर्गवारीची माहिती देणे अपेक्षित होते. ती दिली गेली नाही की जाणून-बुजून मंत्रीमहोदयांची दिशाभूल केली गेली, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
घुंगुरकाठी ही संस्था आणि आडाळी औद्योगिक क्षेत्र स्थानिक विकास समिती गेली दहा वर्षे आडाळी औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग सुरू व्हावेत, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. येथे उद्योग येण्यासाठी अनेक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या उद्योजकांचे स्वागतही ग्रामस्थांतर्फे केले जाते. आडाळी औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणि रोजगार आणण्याच्या श्री. केसरकर यांच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुकच करतो. मात्र हरितक्षेत्रात लाल श्रेणीतील उद्योग आणण्याची त्यांची घोषणा मात्र कोड्यात टाकणारी आहे. कदाचित निवडणुका जवळ आल्यामुळे केलेला हा एक निवडणूक जुमला आहे की काय, अशी शंका घेण्यासही वाव आहे, असे श्री लळीत यांनी म्हटले आहे. कारण दहा वर्षे उलटली, अशाच प्रकारच्या अनेक घोषणा झाल्या. मात्र अद्याप एकही उद्योग आडाळी येथे सुरु झालेला नाही, हे वास्तव आहे, याकडेही श्री. लळीत यांनी लक्ष वेधले आहे.