‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवा ‘चे मंत्री केसरकरांनी केलं उद्घाटन

नाट्योत्सवात राज्यभरातील विभागस्तरीय आठ संघ सहभागी
Edited by: भगवान शेलटे
Published on: October 27, 2023 15:51 PM
views 78  views

सावंतवाडी : राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था ( प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर आणि शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि कळसूलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील बॅ.नाथ पै सभागृहात आज शुक्रवार २७ ऑक्टोबरला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या विज्ञान नाट्य महोत्सवाचे  शानदार उदघाटन करण्यात आले.

 या उदघाटन प्रसंगी राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूरच्या संचालक डॉ. राधा अतकरी यांच्यासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेचे संचालक अमोल येडगे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूरचे विज्ञान पर्यवेक्षक राजू नेब, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मानकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव प्रकाश कानूरकर, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, दीपक केसरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी आबा केसरकर, प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.

या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात राज्यातील विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ८ विभागांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. तर या प्रत्येक संघात ८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या नाट्योत्सवासाठी ‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान ‘ हा मुख्य विषय असून श्री अन्न – मिलेट – श्रेष्ठ आहार, खाद्य सुरक्षा, दैनदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सध्याची ( वर्तमान ) प्रगती व समाजातील अंधश्रद्धा व अंधविश्वास हे इतर विषय राहणार आहेत.