गिरणी कामगार संघटनेचा केसरकरांना पाठींबा

Edited by:
Published on: November 15, 2024 16:34 PM
views 168  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. गिरणी कामगारांचे प्रश्न केसरकर मार्गी लावतील असा विश्वास संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला‌. तर मंत्री केसरकर यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधून आचारसंहितेनंतर या प्रश्नावर मुख्यमंत्री लक्ष देतील असे त्यांनी सांगितले. केसरकर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.

सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार यांनी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. गिरणी कामगारांच्या प्रश्नांची जाण केसरकर यांना असून ते आमचे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत केसरकर यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी जिल्हाध्यक्ष शामसुंदर कुंभार, रामचंद्र कोठावळे, लॉरेंस डिसोझा, सुभाष परब, रेखा लोंढे आदींसह सिंधुदुर्ग गिरीणी कामगार सावंतवाडीचे पदाधिकारी उपस्थित होते ‌

यावेळी केसरकर म्हणाले, पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा तिलारी बुडीत धरण क्षेत्रातील नोकऱ्या न मिळालेल्या मुलांना वन टाईम सेटलमेंट करून देत ठरावीक रक्कम दिली होती. त्यानंतर नोकरीवरचा अधिकारी त्यांनी सोडला होता. गिरणी कामगारांची मागणी देखील त्याच स्वरूपाची आहे. घर लवकर तयार होत नसतील तर ठरावीक रक्कम देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय आज जाहीर करता येणार नाही. मात्र, आचारसंहिता संपताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हा विषय मांडून न्याय दिला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शनिवारी सावंतवाडीत येत असून त्यांचे लक्षही याकडे वेधेन असे सांगत संघटनेनं जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल केसरकर यांनी आभार मानले.