
सावंतवाडी : तालुक्यातील एका चिरेखाणीवर कामाला असलेल्या परराज्यातील युवतीवर त्याच ठिकाणी कामाला असलेल्या परप्रांतीय युवकांकडून अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची तक्रार संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तालुक्यातील एका गावात असलेल्या चिरेखाणीवर काही परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. त्याच चिरेखाणीलगत तंबू टाकून हे कामगार वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास याच ठिकाणी असलेल्या एका युवतीवर दोन परप्रांतीय युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संबंधित दोन्ही युवकांनी घटनास्थळावरून पलायन केले. शनिवारी संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जात याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पळून गेलेल्या संबंधित युवकांच्या शोधार्थ सावंतवाडी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.










