
रत्नागिरी : स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून खेर्डी एमआयडीसी परिसरातील ऐतिहासिक सूर्यमुखी मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम नुकताच अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. हा मंदिर परिसर गेली चार-पाच दशके कोकण स्टील कंपनीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला असून, स्थानिकांसाठी श्रद्धास्थान ठरले आहे. जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त सकाळपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री भजनाने या सोहळ्याची सांगता झाली.
या परिसरात सकाळी व्यायामासाठी, धावण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा गुड मॉर्निंग ग्रुप गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवतो आहे. याच ग्रुपच्या पुढाकाराने हनुमान जयंती निमित्ताने मंदिराच्या डागडुजीस प्रारंभ झाला. रेलिंग, काँक्रीट बसायची व्यवस्था, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायक आसनव्यवस्था यासाठी स्थानिक नागरिकांनी श्रमदान आणि निधी उभारणी केली.
दुसऱ्या टप्प्यात, पावसात मंदिरात पाणी साचत असल्याने पूर्ण मंदिर संरचना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी खेर्डी गावातील दानशूर व्यक्ती अनिलशेठ दाभोळकर यांचे मोठे योगदान लाभले. त्यांनी केवळ आर्थिक मदतीच नव्हे, तर स्वतः गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये सहभागी होत मंदिर जीर्णोद्धार कार्यात सक्रिय भाग घेतला. तसेच माजी सरपंच दशरथशेठ दाभोळकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याने जीर्णोद्धाराचे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण झाले.
कार्यक्रमाच्या दिवशी मंदिरात ह.भ.प. भारती महाराज यांच्या उपस्थितीत कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा विधी पार पडले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मंदिर सेवा ही सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
आज हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता, सामाजिक एकतेचे आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक ठरले आहे. खेर्डी एमआयडीसीमधील हनुमान मंदिराचा हा जीर्णोद्धार सोहळा म्हणजे गावकऱ्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची साक्ष आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांतून समाज एकत्र येतो आणि संस्कृतीच्या जडणघडणीत नवा टप्पा गाठतो, हे या सोहळ्याच्या यशातून दिसून आले. शिवसेनेचे चिपळूण शहर प्रमुख उमेशशेठ सकपाळ, उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला व या उपक्रमाचे कौतुक केले.