
बांदा : लढ के लेंगे MIDC चा नारा देत आडाळी औद्योगिक क्षेत्र त्वरित कार्यान्वित करा या मागणीसाठीचा बहुचर्चित भव्य 'लॉग मार्च'चा सामरोप बांदा सर्कल येथे झाला. युवक, महिलांसह अबालवृद्धांनी तब्बल ८ किमी पायी चालत रोजगाराच्या हक्कासाठी एक धक्का देत शासनाला जाग आणली.आडाळीत उद्योजक येत आहेत. पण, शासन त्यांना भूखंड देत नाही. रोजगाराच्या मुद्यावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी उद्योग आणत नाहीत. रोजगारासाठी गोवा गाठा नाहीतर मुंबई, कधी थांबणार हा जीवघेणा प्रवास ? असा जाब लॉग मार्चच्या माध्यमातून शासन व लोकप्रतिनिधींना हजारोच्या संख्येने जमलेल्या दोडामार्ग वासियांनी केला.
आडाळी MIDC सुरू करा, रोजगार आमच्या हक्काचा, आम्ही तो मिळविणारच, नको घोषणा, नको बैठका उद्योग सुरू करा, हाच आमचा हेका ? अशी जोरदार घोषणाबाजी करत आडाळी औद्योगिक क्षेत्र त्वरित कार्यान्वित करा या मागणीसाठीचा बहुचर्चित भव्य 'लॉन्ग मार्च' प्रस्तावित आढळी एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावरून बांदा सर्कल पर्यंत करण्यात आला. तब्बल ८ किमी पायी प्रवास करत ग्रामस्थांच्यावतीन तीव्र भावना मांडल्या. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येने यात सहभागी झाला होता. तर महिलांचाही लक्षणीय सहभाग असल्याने या लॉंग मार्चला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. आडाळी एमआयडीसी लोकाधिकार, कृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या लॉंग मार्चला रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान या लॉंग मार्चला सर्वपक्षीय नेते मंडळींनी जरी पाठिंबा दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वरचष्मा दिसून आला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांसह आडाळी एमआयडीसीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणारे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी त्यांच्या समवेत राजन म्हापसेकर, सुधीर दळवी, प्रमोद कामत यांचा प्रत्यक्ष सहभाग या लॉंग मार्चमध्ये दिसून आला. लॉंग मार्च आयोजन करणारे औद्योगिक क्षेत्र विकास लोकाधिकार कृती समितीचे पदाधिकारी यांनी सुरुवातीला हा लाँग मार्च पक्षविरहित असल्याचे जाहीर केलेले असल्याने या लॉंग मार्चमध्ये सर्वसामान्यांचा ही सहभाग प्रामुख्याने होता.
बांदा सर्कल येथे हा लॉंग मार्च पोहचल्यानंतर उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी कृती समिती अध्यक्ष पराग गावकर म्हणाले, २०१३ ला आडाळी एमआयडीसीला मंजूरी मिळाली. नारायण राणे उद्योग मंत्री असताना हे काम झालं होतं. केवळ ८ महिन्यात ७५ टक्के क्षेत्र शासनाच्या ताब्यात दिलं होतं. मात्र, १० वर्ष सर्वपक्षांची सरकार येऊन गेली. पण, हा प्रश्न कुणाच्या अजेंड्यावर दिसून आला नाही.हा मोर्चा स्थानिक जनतेन हायजॅक केलेला आहे, इतर कुणी नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १५ किमीवर हे क्षेत्र असताना एमआयडीसी मात्र सुरु नाही. इथला तरुण रोजगारासाठी गोव्यात जातो. नोकरीला गेलेलं मुल घरी येईपर्यंत चिंता असते त्यामुळे शासनाने व सत्ताधारी व्यासपीठावरील मंडळीनी आम्हाला न्याय द्यावा असं मत व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी सर्वांचे आभार मानत लवकरच हे काम मार्गी लागून उद्योग व व्यवसाय सूरू होतील असं म्हणाले. तर रोजगार का अडला ? घोड कुणामुळे अडल ? कोण खो घालतय हे पण पाहिजे समोर आलं पाहिजे. विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, चार मंत्री सिंधुदुर्गचे सत्तेत असताना हा लॉंग मार्च कढावा लागतो हे दुर्देव आहे. लोक रस्त्यावर उतरले की हे जागे होत आहेत अस मत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केले.
तर माजी आमदार राजन तेली म्हणाले, पक्षाच्या नेत्यांची माफी मागून आजच्या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालो. पण, यामागे जनतेचे प्रश्न सुटुन लोकांना रोजगार मिळावा हा आमचा हेतू आहे. गेली अनेक वर्षे एमआयडीसीस न्याय मिळत नाही आहे. त्यामुळे एमआयडीसी सुरु करण्यासाठी राजकारण बाजूला सारून सर्व मिळून प्रयत्न करू, सत्तेत असताना लॉंग मार्चमध्ये सहभागी झालो कारण, सरकारनं लक्ष वेधाव. दोडामार्गवासियांची दखल सरकारनं घेतली आहे. त्याबाबत उद्योगमंत्री स्वतः बोलले आहेत. येथील २० हजार मुलं रोजगारासाठी गोव्यात जात आहेत. त्यामुळे येणारी पिढी आपणास माफ करणार नाही. त्यासाठी सत्तेच्या माध्यमातून दोन हातांना काम मिळण्यासाठीच आमचा प्रयत्न असेल, राजकीय टिकेला राजकारणातूनच उत्तर दिलं जाईल. आडाळीत सरकारला रोजगार द्यायला भाग पाडायची ताकद जनतेत आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. राजकीय पादत्राणं बाजूला ठेवू असं विधान माजी आमदार राजन तेली यांनी केल. याप्रसंगी स्थानिक आमदार दीपक केसरकर समर्थक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. परंतु, व्यासपीठावर मतप्रदर्शन करण्याची संधी न दिली गेल्यानं त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आभार प्रदर्शनादरम्यान केसरकर समर्थकांनी सभास्थळाहून काढता पाय घेतला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, भाजपचे एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, केसरकर समर्थक, शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, गोपाळ गवस, माजी सभापती प्रमोद कामत, संतोष नानचे, रवींद्र मडगावकर, सुधीर दळवी, महेश धुरी, सुधीर आडीवरेकर, चंद्रशेखर देसाई, बंटी पुरोहित, आनंद नेवगी यांसह सत्ताधारी- विरोधी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.