
कुडाळ : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून रणधुमाळी चालू झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायत निवडणूक सरपंचपदासाठी प्रतिष्ठेची ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमतः पार पडत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठेच्या असलेल्या सरपंचपदासाठी म्हापण चव्हाणवाडी प्रभाग ४ मध्ये सध्या उमेदवारीसाठी चुरस पहायला मिळत आहे.
सरपंच पद हे राखीव अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने प्रभाग ४ मध्ये सध्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून गुप्त बैठकांचे सत्र जोर धरू लागले आहे. म्हापण चव्हाणवाडी सर्वात जास्त प्रभाग ४ मध्ये जवळपास २३० एवढे मतदार असल्याने हा प्रभाग निवडणुकीसाठी महत्त्वाचा व निर्णायक म्हणून समजला जातो.
म्हापण ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात असली तरी आत्ता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे दोन गट पडल्याने ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी राहिली नसून येथे मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते देखील सक्रिय झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत भाजप पुरस्कृत उमेदवार देऊन आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून देखील कंबर कसल्याचे पाहावयास मिळत आहे.
यामुळे म्हापण चव्हाणवाडी प्रभाग ४ सध्या उमेदवारीसाठी गुप्त बैठका घेऊन उमेदवारांसाठी चाचणी केली जात असून सध्याच्या युवा मतदारांकडून मात्र या निवडणूकीतसाठी जास्तीत जास्त युवा उमेदवारांना संधी देण्यात यावी व ही निवडणूक बिनविरोध होऊ नये त्यासाठी आग्रह धरला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
प्रभाग क्रमांक ४ हा सरपंच पदासाठी राखीव आरक्षित असल्याने येथे सरपंच पदासाठी बरेच उमेदवार इच्छुक असल्याने येथील स्थानिक नेतृत्वांना देखील उमेदवारी देणे सुद्धा डोकेदुखी ठरणार यात मात्र शंका नाही. त्यामुळे येथे प्रत्यक्ष उमेदवार दिल्यानंतरच नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता असल्याची कुजबूत देखील सध्या चालू आहे.