
वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी वेंगुर्लेच्या वतीने प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. तालुक्यातील ज्या प्रशालांचा निकाल १०० टक्के लागला त्या प्रशालेतील मुख्याध्यापकांचा सत्कारही करण्यात येतो. याशिवाय पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीधारक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारकांचाही सन्मान केला जातो. दरम्यान हा सन्मान सोहळा आज २ ऑगस्ट रोजी येथील स्वामिनी मंडपम येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिली आहे.
भाजप वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि तालुक्यातील दहावी बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल देणाऱ्या प्रशालेतील मुख्याध्यापकांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्यासाठी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाळू देसाई व सुहास गवंडळकर यांनी केले आहे.